बदली झाल्याने प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी गहिवरले

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

विद्यार्थी आणि शिक्षकांचे यांचे नाते घट्ट असते. विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिक्षकांच्या सहवासातच जातो. त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिव्हाळा निर्माण होतो.

दगडी येथील जि.प.प्राथमिक शाळेतील शिक्षक अविनाश खंडारे यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना गहिवरून आले. तर शिक्षक अविनाश खंडारे यांना देखील अश्रू अनावर झाले.

यावल तालुक्यातील दगडी  येथील शिक्षक अविनाश खडारे हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांसोबत त्यांचा चांगलाच लळा होता. मागील सात वर्षांपासून ते दगडी येथे कार्यरत होते. मात्र नुकतीच त्यांची जिल्हा अंतर्गत  बदली बुलढाणा येथे झाली आहे.

विद्यार्थी नेहमी प्रमाणे शाळेत आल्यानंतर त्यांना खंडारे सरांची बदली झाल्याची माहिती मिळाली. आज आपल्या सरांना निरोप दिला जाणार, आपले आवडीचे शिक्षक शाळा सोडून जाणार या भावनेने विद्यार्थी अस्वस्थ झाले. शिक्षक अविनाश खंडारे शाळेतून निघत असताना विद्यार्थी गहिवरले. हे पाहून शिक्षक अविनाश खंडारे देखील अश्रू रोखू शकले नाही.

हळव्या झालेल्या विद्यार्थ्यांना समजावत ग्रामस्थांनी अखेर शिक्षक अविनाश  खंडारे व सुनिल काळे यांचा  शाल पुष्पगुच्छ देऊन पो.पा.विठ्ठल कोळी व शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष विनायक कोळी यांच्या हस्ते सत्कार करुन निरोप दिला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद पाटील, साहेबराव कोळी, प्रमिलाबाई कोळी, सिधुंबाई मोरे, गोकुळ सोनवणे, मनवेल जि.प.शाळेतील ज्योती चौधरी, प्रविण पाटील, महेंद्र मोरे, अविनाश कोळी, सुभाष कोळी, कैलास कोळी सह गावातील ग्रामस्थ हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.