मनपाच्या ७८८ कर्मचाऱ्यांचे सातव्या आयोगानुसार होणार पगार

0

जळगाव ;– महापालिकेतील ९३ कार्यरत कर्मचारी वगळता उर्वरीत ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी डिसेंबर महिन्याचे वेतन थांबविण्यात आले असून सातवा आयोग लागू करून शुक्रवारी किंवा सोमवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर पगार जमा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय मार्गी लागला असून डिसेंबर महिन्याच्या वेतनात हा वेतन आयोग लागू करून पगार केले जाणार आहेत. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन थांबविण्यात आले होते. यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले. काहींचे बँकेचे हप्ते थकले असून त्यांची बँकेतील पत खराब झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून सातवा वेतन पुढील महिन्यात लावा पण पगार करा, अशी मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून दोन दिवसात सातवा वेतन आयोग लागू करून पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु असून शुक्रवार किंवा सोमवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होईल, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परंतु यामध्ये उड्डाण पदोन्नती धारक ९३ कार्यरत कर्मचाऱ्यांना वगळण्यात येणार आहे. सदर ९३ कर्मचाऱ्यांना जानेवारी अखेरपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करून त्यांचे पगार करण्यात येतील, असेही मनपाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

२४६ कर्मचारी सेवानिवृत्त
तत्कालिन नगरपालिकेने ३७८ कर्मचाऱ्यांना उड्डाण पदोन्नत्या दिल्या होत्या. त्यापैकी ३९ कर्मचारी मयत झाले असून २४६ कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. तर, ९३ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सदर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.