“मला तर धाकच पडलाय त्यांचा..”, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापतच आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपला असून आता त्यांनी २० जानेवारीला आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे.  त्यातच छगन भुजबळही आक्रमक झाल्याने  राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भुजबळांवर जोरदार निशाणा साधला आहे.

तुम्हाला शॉक बसायचा

“तो माणूस लैच कामातून जायचा अंदाज दिसतोय. मला तर धाकच पडलाय त्यांचा. तुमच्याकडून सुसंस्कृतपणा काय शिकायचा भुजबळ साहेब. सुधरा. आज म्हणतोय सुधरा. तुम्हाला शॉक बसायचा राव. तुम्ही राज्यातला एक अभ्यासू माणूस आहात. मला फार टेन्शन येईल तुम्हाला झटका बसला तर. इतका चांगला माणूस पागल होऊन द्यायचा नाही आम्हाला. मला फारच वाईट वाटायला लागलंय आता. काय बरळेल हा माणूस. काय झालं असेल तुम्हाला? सांगा तरी”,  “महाजन साहेबाला तीनदा सांगितलं जाऊन द्या फटकून, तर तेही येत नाहीत. त्यांना वाटतंय का हे येडे व्हावेत म्हणून? काय बोलतो एवढा मोठा माणूस. चांगले विचार आहेत तुमचे. तुमची संस्कृती या बोलण्यावरूनच लक्षात आली. कोयत्याची, काठ्यांची, पाय तोडण्याची भाषा करणारे तुम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवणार आहात राज्याला? तुम्ही तुमचं बघा ना. आम्ही आमचं बघतो. आम्ही लढणार. तुम्ही गप्पा ठोकायला बसलेत फक्त”, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधला.

सरकारला वारंवार मुदतवाढ 

दरम्यान, मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सरकारला वारंवार मुदतवाढ का दिली जात आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, “आधी मी एक महिना दिला. तेव्हा लक्षात आलं की समितीचे पुरावे घेणं गरजेचं आहे. आम्ही सरकारला दिले होते ४ दिवस. सरकारने सांगितलं ४ दिवसांत कायदा पारित होणार नाही. आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही. ३० दिवसांचा वेळ सरकारने घेतला. आम्ही त्यासाठी ४० दिवसांचा अवधी दिला. त्यांनी अहवाल तयार दिला, सरकारने स्वीकारलाही”, “आमची बोली होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळावं. त्यासाठी पुन्हा २४ डिसेंबरपर्यंत आम्ही त्यांना काम करण्यासाठी वेळ दिला”, असंही ते म्हणाले.

आंदोलन छोटं नाहीये

दरम्यान, १७ डिसेंबरला झालेली सभा निर्णायकच होती, असं जरांगे पाटील ठामपणे म्हणाले. “आंदोलन छोटं नाहीये. आम्हालाच वेळ कमी पडतोय. तिथे जर मी म्हणालो असतो की २५ डिसेंबरला चला मुंबईला. लोक दणादणा निघाले असते. पण दोन दिवसांत माघारी यायला लागलं असतं. देशात याआधी लाखोंच्या संख्येनं आंदोलनं झाली आहेत. पण ती मोडली. का मोडली, यामागची कारणं बघायला लागतील. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे आहे म्हणून काहीही निर्णय घ्यायचे आणि समाजाला फसवायचं हे माझ्याकडून कधीही होणार नाही. मुंबईला काय ५० किलोमीटर जाऊन माघारी यायचं असा विषय नाही. तिथे जाऊन जिंकून यायचं आहे”, असं पाटील म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.