आता मंगळग्रह मंदिरातील महाप्रसाद बनेल पितळ, फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

श्री मंगळग्रह मंदिरात मिळणाऱ्या महाप्रसादातील सर्व खाद्य पदार्थ आता यापुढे कल्हई केलेली पितळीची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातच बनणार आहे. येत्या गणेश जयंतीपासून अर्थात १३ फेब्रुवारी पासून या भांड्यांचा वापर सुरु होणार आहे. भाविकांच्या आरोग्याच्या काळजीतून मंदिराचे सुव्यवस्थापन करणाऱ्या मंगळ ग्रह सेवा संस्थेने हा निर्णय घेतला आहे. महाप्रसादातील सर्व पदार्थ फक्त गावरान तूप व शेंगदाणा तेलात बनविले जातात, हे विशेष.

मंदिरात भारताच्याच नव्हे तर जगाच्याही काण्याकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात. त्यांना भरपेट व आरोग्यदायी अन्न मिळावे म्हणून त्यांची काळजी घेत याठिकाणी अल्पदरात पौष्टीक व दर्जेदार महाप्रसाद दिला जातो. महाप्रसादात खान्देशी भोजन अर्थात पंचरत्न दाळ, भात, बट्टी, मटकीची भाजी आणि जिलेबी असे चविष्ट पदार्थ असतात. अ‍ॅल्यूमिनियमच्या भांड्यांचा वापर आरोग्यासाठी घातक असल्या कारणास्तव संस्थेने हे सर्व खाद्य पदार्थ कल्हई केलेली पितळीची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातच बनविण्याचा निर्णय घेतला आहे. ही भांडी गुजरात येथून थेट उत्पादका कडून घेतली आहेत.

८ रोजी मंदिरात केशव पुराणिक, सारंग पाठक, जयेंद्र वैद्य, अक्षय जोशी, मेहुल जोशी व गणेश जोशी यांनी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहीरम, विश्वस्थ अनिल अहिरराव व डी.ए.सोनवणे यांच्या हस्ते या भांड्यांची विधीवत पूजा करून घेतली.

समाजाभिमुखता आणि लोककल्याण हेच ब्रीद

समाजाभिमुखता व लोककल्याण हेच मंगळ ग्रह सेवा संस्थेचे ब्रीद आहे. त्यातूनच आम्ही हा खर्चिक मात्र भाविकांसाठी आरोग्यदायी निर्णय घेतला आहे. अल्युमिनियम सह फुडग्रेड नसलेल्या सर्वच प्रकारच्या भांड्यांचा वापर सक्तीने बंद होणे काळाची गरज आहे. शासनाकडेही आम्ही त्यावर बंदीची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.