आयकर विभागाची भीती घालून वसुली; तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मुंबई : पैशांची बॅग घेऊन निघालेल्या अंगडियांना आयकर विभागाची भीती घालून वसुली करणाऱ्या एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात त्यांच्याच पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे, सहायक निरीक्षक नितीन कदम, उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कदम आणि जमदाडेला अटक करण्यात आली असून, वंगाटेचा शोध सुरू आहे. गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी भुलेश्वर येथील अंगडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सावंत यांची भेट घेऊन त्रिकुटाकडून पैशासाठी सुरू असलेल्या त्रासाबाबत सांगितले होते.

हे तिन्ही अधिकारी पोफळवाडी परिसरात ज्यांच्या हातात पैशांची बॅग असेल त्यांना मुंबादेवी पोलीस चौकीत नेऊन त्यांच्याकडून पैसे उकळत असत. याबाबतची लेखी तक्रार मिळताच, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले.

त्यानुसार, दिलीप सावंत यांनी याच्या नेतृत्वात चौकशी सुरू केली. यात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, नोंदवही, तसेच तक्रारदार आणि आरोप असलेल्या पोलिसांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यामध्ये या त्रिकुटाने २, ३,४ आणि ६ डिसेंबर रोजी पोफळवाडी परिसरात अंगडिया व्यापार करणाऱ्याना आयकर विभागाची भीती घालून पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले.

तसेच, पोलीस ठाण्याबाहेर जाताना नोंदवहीत नमूद करणे गरजेचे असताना, वरील चार तारखांना त्यांनी कुठलीही नोंद केली नव्हती. तसेच, ६ डिसेंबर रोजी तपासणी केलेल्या व्यक्तीची नावे फक्त दैनंदिनीमध्ये नोंद केली आहे. मुंबादेवी चौकीमधील घडामोडीबाबतही कोणत्याही नोंदी करण्यात नव्हत्या.

वंगाटेने पोफळवाडी परिसरात अंगडियाना अडवून त्यांच्याकडे पैशांच्या बॅगा तपासल्या. मात्र, याबाबतच्या कुठल्याही पंचनाम्याची नोंद करण्यात आलेली नाही. तपासात तिघांनीही संशयितांवर कारवाई करण्याच्या नावाखाली वसुली केल्याचे स्पष्ट होताच, गुन्हा नोंदवत अधिक कारवाई सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

चुकीच्या नोंदी…

ओम वंगाटे याने ठाण्यातील नोंदीमध्ये काही साक्षीदारांच्या चुकीच्या नोंदी केल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, संबंधित पुरावे सावंत यांनी वरिष्ठांना सादर केले आहेत.

सीसीटीव्हीमध्ये भेटीगाठी कैद..

सीसीटीव्हीमध्ये एल.टी. मार्ग ते मुंबादेवी चौकीपर्यंतच्या सीसीटीव्हीमध्ये अंगडिया यांना चौकीकडे घेऊन जाण्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. यामध्ये कदम, आणि जमदाडे यांनी वंगाटे वरिष्ठ असल्यामुळे त्याच्या आदेशाचे पालन केल्याचे सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.