महाराष्ट्र चेंबरच्या नाशिक कार्यालयासाठी उद्योगमंत्र्यांकडून जागा मंजूर – ललित गांधी

0

चेंबरच्या ९६ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच १ कोटी ३२ लाखांचे उत्पन्न

नाशिक : महाराष्ट्र चेंबरच्या नाशिक कार्यालयासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दहा हजार चौरस फुटाचा भूखंड उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केला आहे. त्यासह पहिले महिला क्लस्टर नाशिकमध्ये लवकरच स्थापन होणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित यांनी आश्वासित केले. महाराष्ट्र चेंबरच्या ९६ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच १ कोटी, ३२ लाख रुपये गेल्या वर्षभरात उत्पन्न मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबरतर्फे अध्यक्ष ललित गांधी यांनी २४ मे रोजी नाशिक येथील हॉटेल एस.एस.के सॉलिटेर येथे महाराष्ट्र चेंबरचे सभासद, व्यापारी औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याशी थेट संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल विविध संस्था, संघटनांतर्फे ललित गांधी यांचा सत्कार झाला.

अधिक माहिती देताना चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून राज्याचा विकास करण्यासाठी चेंबरतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्यांचा व्यापारी व उद्योजकांना फायदा होण्यासाठी चेंबरच्या उपक्रमात होण्याची गरज आहे. राज्यभरात महाराष्ट्र चेंबर विविध क्लस्टर निर्माण करत असून त्यासाठी आवश्यक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनी अंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यात क्लस्टर स्थापन करण्यात येणार असून पहिले महिला क्लस्टर नाशिकमध्ये लवकरच स्थापन होईल.

या वेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष हेमंत राठी, संतोष मंडलेचा, विश्वस्त विलास शिरोरे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उत्तर महाराष्ट्र शाखेचे चेअरमन कांतीलाल चोपडा, को- चेअरमन संजय सोनवणे, सदस्य शिवदास डागा, माजी उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा उपस्थित होते. अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी अध्यक्ष हेमंत राठी, संतोष मंडलेचा यांनी ललित गांधी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे सभासद मुकेश चोथानी, पराग झालावत, नीलिमा पाटील, कन्हैया मणियार, श्रीकांत पाटील यांनी अध्यक्षांशी संवाद साधला. त्यांनी जीएसटी, प्रोफेशन टॅक्स आदींबाबतचे प्रश्न मांडले.

संजय राठी यांनी नाशिकमध्ये ६ ते ९ ऑक्टोबर २३ दरम्यान महाराष्ट्र चेंबर पुरस्कृत महाराष्ट्र ट्रेड इंटरनॅशनल एक्स्पो होत असल्याचे सांगितले. युवा समितीचे चेअरमन संदीप भंडारी यांनी युवा समितीच्या कार्याची माहिती दिली. अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते नामको बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवदास डागा यांचा सत्कार झाला.
या वेळी हेमंत कांकरिया, राजाराम सांगळे, रवी जैन, विकास पगारे, प्रशांत जोशी, व्हिनस वाणी, सचिन जाधव, अंजु सिंघल, रणजितसिंग आनंद, ललित नहार, सी. एस. सिंग, दत्त भालेराव, स्वप्निल जैन, डॉ. मिथिला कापडणीस, कैलास पाटील, रतन पडवळ, प्रफुल्ल संचेती, रविंद्र झोपे, राजेश मालपुरे, भावेश मानेक, राजेंद्र कोठावदे, मनीष रावल, प्रमोद दीक्षित, सोनल दगडे, दिपाली चांडक आदींसह व्यापारी उद्योजक उपस्थित होते.
विविध संस्था संघटनातर्फे अध्यक्ष गांधी यांचा सत्कार
महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल अध्यक्ष ललित गांधी यांचा मोटार मर्चंट असोसिएशनतर्फे कैलास चावला, साजिद शेख, नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेखर दशपुते, उपाध्यक्ष एकनाथ अमृतकर, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय बाविस्कर, नाशिक कस्टम्स ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष सी. एस. सिंग, यतीन पटेल, राहुल देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सीमाचे अध्यक्ष किशोर राठी, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय बाविस्कर, डॉ. हेमलता पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते सत्कार झाला.

अनेक राज्यस्तरीय प्रश्न मार्गी लावले

अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यापासून अनेक राज्यस्तरीय प्रश्न मार्गी लावले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे व्यापारी आणि उद्योजकांच्या विविध मागण्या मांडून त्या मार्गी लावल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे ५० वे सत्र राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली १५ जून, २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता राजभवनातील दरबार हॉल मध्ये दिमाखदार सोहळ्याचे नियोजन केले आहे. त्यासह एकदाच वापरल्या जाणाऱ्या आणि विघटन होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापरावरील निर्बंध, कोरोना काळात सरकारकडे प्रलंबित असलेले उद्योजकांचे अनुदान थेट खात्यात जमा, विदर्भ विकास परिषद, उत्तर महाराष्ट्र विकास परिषद, राज्यस्तरीय कौशल्य विकास परिषद, महाराष्ट्र ट्रेड इंटरनॅशनल एक्स्पोला (मायटेक्स) लाखो नागरिकांनी भेट देऊन कोट्यावधी रुपयांची ऊलाढाल झाली. त्याचा व्यापारी, उद्योजकांना मोठा फायदा झाला. कालबाह्य एलबीटी प्रकरणी नाशिकच्या विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. दरम्यान येत्या काही दिवसांत महाराष्ट्र चेंबर पुरस्कृत महाराष्ट्र ट्रेड इंटरनॅशनल एक्स्पो पुणे व नाशिक येथे होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.