महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला चितपट करत माऊली कोकाटे ठरला पहिला “आमदार केसरी”

0

आ. मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे २ लाख ५१ हजारांचे रोख बक्षीस व चषक भेट.

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यामध्ये कुस्ती व व्यायामाला प्रोत्साहन देण्यासाठी तालीम, अत्याधुनिक व्यायामशाळा, क्रीडा संकुल, ओपन जिम साठी १० कोटींचा निधी.
चाळीसगाव दि.४ एप्रिल – तालुक्यातील पिलखोड येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने माऊली तालीम, पिलखोडच्या वतीने “आमदार केसरी” (MLA Kesari) कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्यातर्फे मानाच्या कुस्तीसाठी २ लाख ५१ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

चाळीसगावच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात प्रथमच झालेल्या आमदार केसरी कुस्ती स्पर्धचे डोळ्याचे पारणे फेडणारे आयोजन व हजारो कुस्ती प्रेमींच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात अंतिम सामना रंगला. जवळपास ३५ हुन अधिक मिनिटं निकाली कुस्ती सामन्यात निर्णय न झाल्याने अखेर ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या सूचनेनुसार गुणांवर सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याच्यावर ताबा मिळवत गुण कमवत उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे हा “आमदार केसरी -२०२३” स्पर्धेचा मानकरी ठरला. आमदार मंगेश चव्हाण व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्याहस्ते २ लाख ५१ हजार रुपये रोख व चषक देऊन माऊली कोकाटे यांना सन्मानित करण्यात आले.

तसेच सदर कुस्ती स्पर्धेत लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत अनेक कुस्त्या मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आल्या.
दुपारी ४ वाजेपासून ते रात्री १० पर्यंत चाललेल्या या स्पर्धांमध्ये एकूण ५०० कुस्त्या झाल्या, त्यात ११ जोड कुस्त्यांना १.५ लाखांची बक्षिसे, खल्या जोडयांना २ लाखांची बक्षिसे तसेच ३५ हजारांची २५० भांडे बक्षीसे ठेवण्यात आली होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले की, चाळीसगाव तालुक्यात कुस्ती ची मोठी परंपरा आहे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी या मातीने महाराष्ट्राला दिला आहे. कुस्ती व व्यायामाला प्रोत्साहन मिळावे अत्याधुनिक क्रीडा संकुल, तालीम, २० अत्याधुनिक व्यायामशाळा, १७ क्रॉसफीट जीम यासाठी १० कोटी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चाळीसगाव येथे आयोजित करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माऊली तालीम पिलखोड, गिरणा पंचक्रोशीतील कुस्तीगीर व सरपंच, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.