तिला हवे असलेल प्रेम

0

लोकशाही विशेष लेख

विषय जरा कठीण आहे… लिहायला आणि बोलायलाही तितकाच कठीण… आज मानवाने खूपसारी प्रगती केली. प्रत्येक क्षेत्रात त्याने काम केले. कठीण वाटणाऱ्या कामांना सुद्धा त्याने फतेह करून दाखवले. त्याला जे हवे त्याने ते आपल्या हक्काने आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर मागून आणि तयार करून घेतले. पण ह्या सर्वात एक गोष्ट आपण विसरतोय, आणि ती म्हणजे स्त्री.

स्त्रीने सुद्धा माणसाच्या खांद्याला-खांदा लावून आजवर ह्या देशाचे नाव उंच केले आहे. तिने सुद्धा प्रत्येक क्षेत्रात आपली एक नवी ओळख लोकांपर्यंत पोहचवली आहे. कधीही न घाबरता, कुठेही न डगमगता आणि धीर न सोडता तिच प्रत्येक पाऊल हे आपल्याला प्रगती पथावर घेऊन जाताना दिसत आहे. २१ व्या शतकातली ही स्त्री जणू भारतासाठी वरदानच आहे असे वाटते. जेव्हा कधी संकट जर आपल्यावर ओढवले आहे, तेव्हा तरी ह्या स्त्रीने दुर्गेच रूप घेऊन दरवेळी आपले रक्षण केलेच आहे.

राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai), सरोजिनी नायडू (Sarojini Naidu), कल्पना चावला (Kalpana Chavala), सुनिता विल्यम्स (Sunita Williams), इंदिरा गांधी (Indira Gandhi) किंवा प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) असो ह्यांनी वेगवेगळ्या रुपात येऊन भारताचे वर्चस्व तर गाजवले. शिवाय त्या वेळेवर संकटमोचकही झाल्यात. परंतु आता जसजसा काळ बदलत चालला आहे; तसतसा लोकांचा भरवसा ह्या दुर्गेवरून उठत चालला आहे. का म्हणून ह्यांच्या वाट्याला इतका त्रास येतोय, काही कळायला मार्ग नाहीच. दरवेळी काही चांगले करायला जर त्या जात असतील; तर साऱ्या दुखांच कारणही त्यांनाच मानले जाते.

जुन्या अंधश्रद्धेप्रमाणे (Superstition) आजही त्यांना खूप साऱ्या गोष्टींना मुकावे लागते. घरात राहत असताना सुद्धा त्यांना व्यवहार काय असतो, हे आजही कळलेले नाही. त्यांना फक्त ‘चूल आणि मुल’ ही संकल्पना कायम राखत ठेवण्यासाठीच लग्न करून आणले जाते; आणि एका घरात ठेवलेल्या बाहुलीप्रमाणेच सजवले आणि ठेवले जाते. तिच्या इच्छां, आकांक्षाची रांगोळी तर तिच्या घरवाल्यांनी तर पहिलेच जन्म घेतल्यापासून हिरावून घेतलेली असते. मग ती एका दलदलीत निघून दुसऱ्या दलदलीत येऊन फसून जाते. तिच्या मनातले सासरसुख फक्त ती स्वप्नातच पाहू शकते. कारण तिच्या अपेक्षांचं पदरी पडणार सुख हे तिच्या घरच्यांनी कुणा एका निर्दयी माणसाच्या हातात दिलेलं असते, आणि मग तेथून सुरु होते तिची अवहेलना, भेदभाव. ह्या साऱ्या गोष्टी पचवत ती फक्त सुखाची झोप देवाकडे मागते.

जग बदलत आहे, म्हणून ती सुद्धा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते; परंतु तिच्या वाटेला खूप सारे समाजकंटक हे पावलोपावली बसलेले दिसूनच येतात. तिच्या प्रत्येक कार्यात असो किंवा चांगल्या मार्गात असो, हे समाजकंटक फक्त तिला डिवचण्याच काम करतात. तिच्याही काही इच्छां असतील ह्याचा साधा कुणी विचार सुद्धा करत नाही. जन्म घेतल्यापासून तिला दरवेळी प्रत्येकाची परवानगीच घ्यावी लागते. हे असं नको, ते तसंच कर ह्या वाक्याने ती आयुष्यभर अर्धमेली होत असते. नंतर शाळा किवा कॉलेज चांगली भेटली तर ठीक नाहीतर अपूर्ण शिक्षण, नाहीतर अपूर्ण ज्ञानाअभावीतिची दुर्गती व्हायला वेळ लागत नाही.

आजवर कित्येक घरे ही अजन ही निरक्षर आहेत. ह्याचा जर हिशोब केला ना तर निरक्षरता कळेल. काहींची तर इतक्या कमी वेळात लग्न लावून देण्यात येतात की, विचार करूनच अंगावर काटा उभा राहतो. प्रसूती वेळात होणारी वेदना ही असह्य करून टाकणारी असते. हे माणसांना कधीच कळणार नाही. जे वय तिच्या खेळ खेळण्याचे, शिकण्याचे आणि बागडण्याचे असते; त्याच वयात तिला संसार सांभाळण्याच्या चाब्या हाती देण्यात येतात. ज्या वयात तिला कितीतरी गोष्टींची ओळख करुन द्यायची असते ; त्याच वयात तिला दुश्कर्म करायला सांगणारा आजचा हा समाज कितीतरी पटीने अजून जागृत झालेला नाही असे तरी मला वाटते.

शिकली तर ठीक नाहीतर तिचं काही खर नाही, असे म्हणायला सुद्धा आता वावग ठरणार नाही. पतीकडून आनंदाच्या दोन गोष्टी जरी तिला मिळाल्या ना तरी ती अख्ख्या घराचं सोनं करते. असे म्हणतात की, मुलगी शिकली तर प्रगती होते. आणि हे सार्थ करण्यासाठी तिला हवा असतो आपल्या लोकांचा पाठींबा. तो तरी सध्या आता कुठे दिसत नाही. म्हणून आता ह्या समाजाला बदलण्याची खूप गरज आहे.

मुलगी म्हणजे, फक्त साधन नव्हे तर आपली जबाबदारी हा विचार त्यांना पक्का मनावर रुजवावा लागणार आहे. तेव्हा कुठेतरी हा समाज एका परिवर्तन भारताकडे वाटचाल करेल हे मात्र नक्की खरे. शेवटी जाताना फक्त इतकेच म्हणावेसे वाटते की,
तिला आहे अधिकार जगण्याचा आणि शिकण्याचा,
तो फक्त तिच्याकडून हिरावू नका
देऊन बघा एक संधी आपणही तिला,
वाट ही तिची उगाच अडवत बसू नका
हो आहे जरी पर्यायाने कमी तुमच्यासमोर,
का म्हणून फक्त डिवचू नका
करून द्या तिला आज स्वतंत्र,
उगाच तिच्या स्वप्नांना थांबवू नका

विवेक भदाणे
8208705647

Leave A Reply

Your email address will not be published.