मधुकर सह. साखर कारखान्याला जिल्हा बँकेचा दणका !

0

एकेकाळी सहकार क्षेत्रात विशेषत: सहकारातील साखर कारखानदारीत समृध्द असलेल्या जळगाव जिल्ह्यातील सहकाराला घरघर लागली आहे. सहकार क्षेत्रात जिल्ह्यात असलेल्या एकूण 6 साखर कारखान्यांपैकी एकही कारखान्याची स्थिती चांगली नाही. विशेषत: सर्वात जुने 40 वर्षे पार केलेल्या फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना, कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना आणि चाळीसगावच्या बेलगंगा सहकारी आणि चाळीसगावच्या बेलगंगा सहकारी साखर कारखाने बंद असल्यने सारखेचे उत्पादनच होत नाही. या तिन्ही जुन्या सहकारी कारखान्यांपैकी वसंत सह. साखर कारखाना कर्जापोटी बँकेने ताब्यात घेतला. सदर कारखाना विक्रीतून अथवा भाड्याने देऊन कर्जाची वसुली करण्याचे बँकेचे नियोजन पूर्णत: चुकले आहे.

आज वसंत सह. साखर कारखान्याची भंगारावस्था निर्माण झाली आहे. धोबी का कुत्ता घरका ना घाटका अशाप्रकारे कारखाना बनलाय. वसंत साखर कारखाना बँकेने ताब्यात घेऊन काय साधले ? आज त्या परिसरातील शेतकरी आणि कामगार कठीण जीवन जगत आहेत. कर्जबाजारी बेलगंगा सह. साखर कारखाना बँकेतर्फे खाजगी कंपनीत विकून आपल्या कर्जाची रक्कम प्राप्त केली. परंतु शेतकरी आणि कामगारांच्या दैन्यावस्थेची कुणी काळजी घेत नाही. जळगाव जिल्ह्यातील एकमेव मधुकर सह. साखर कारखाना गेल्या तीन वर्षापूर्वीपर्यंत सुस्थित होता तथापि त्यालाही घरघर लागली आणि गेल्या तीन वर्षापासून मधुकरचेही साखर उत्पादन बंद आहे. कर्जाच्या थकबाकीमुळे जिल्हा बँक कर्ज देणे बंद केले आहे. त्यामुळे मधुकर कारखाना भाडेतत्वावर चालवायला देऊन कारखाना सुरू ठेवण्याचा संचालक मंडळानी प्रयत्न केला. वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी सभासदांनी त्याला एकमुखी मान्यता दिली. जिल्हा बँकेने सुध्दा भाडेतत्वावर देण्यासाठी तत्वत: मान्यता दिली. परंतु घोडे कोठे आडले हे कळत नाही. शेतकरी कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या असतांना जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेण्याच्या निर्णयामागे त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

चोपडा सहकारी साखर कारखान्याला अनेक वर्षापासून जिल्हा बँक कर्जपुरवठा करीत नाही. कारण हा कारखाना बँकेच्या ब्लॅकलिस्टमध्ये आहे. शेवटी चोसाकाच्या संचालक मंडळाने खाजगी अर्थसंस्थांकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज घेऊन कारखाना चालू ठेवला. तथापि दोन वर्षापूर्वीपासून हा कारखाना सुध्दा बंद पडला होता. तथापि संचालक मंडळाने ज्या अर्थसंकल्पनेतून कर्ज घेतले होते. त्यांचेशी सामंजस्याचा करार करून वन टाईम सेटलमेंट केली गेली आणि चोसाका भाडेतत्वावर देण्यत आला. आज चोसाका सुरू आहे. खाजगी अर्थसंस्था सेटलमेंट करू शकते तर जिल्हा बँक तसे सेटलमेंट का करू नये? हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने नियमांच्या आधीन राहून मधुकर सह. साखर कारखान्याला सहकार्य करण्याची गरज आहे. साखर कारखान्याच्या संदर्भात सत्तेवर असलेल्या शासनाची पॉलिसी नडते म्हणून मधुकर सह. साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी भाजप- सेना युतीच्या शासन काळात केवळ कारखान्याचे हित लक्षात घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. वास्तविक पहाता शरद महाजन यांच्या वडिलांपासून संपूर्ण घराणे काँग्रेसचे असतांना शरद महाजनांनी भाजपात प्रवेश करण्याची तडजोड केली. तथापि शरद महाजन यांचे दुर्दैव असे की, भाजपची महाराष्ट्रातील सत्ता जाऊन अन्‌ महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले अन्‌ बिचारे महाजन पुन्हा पोरके झाले. कारखान्याचा प्रश्‍नही सुटला नाही. कर्ज वाढतच गेले आणि तीन वर्षापासून कारखाना बंद अवस्थेत आहे.

जिल्ह्यातील मुक्ताईनगर सह. साखर कारखाना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सहकार क्षेत्रात सुरू केला. परंतु पहिल्या एक – दोन हंगामानंतरच याही कारखान्याला घरघर लागली. कारखाना बंद पडला. बरेच वर्षे तो बंद अवस्थेत होता. परंतु सदरचा कारखाना अखेर गेल्या 6 वर्षापूर्वी खाजगी कंपनीला विकावा लागला. खाजगी कंपनीच्यावतीने मात्र कारखाना सुरळीत सुरू आहे. दुसरा रावेर येथील श्री क्षेत्र ओंकारेश्‍वर सह साखर कारखाना माजी आमदार राजाराम गणू महाजन यांचे नेतृत्वात सुरू झाला. परंतु याही कारखान्याची अवस्ता एक दोन गळीत हंगामनंतर डबघाईस आला. शेवटी लक्ष्मीपती बालाजी या खाजगी कंपनीला कारखाना विकला गेला. परंतु विकल्यानंतर सुध्दा कारखाना कायदेशीर वादामुळे बंदच आहे. म्हणजे एकंदरीत जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. परंतु त्यांची दखल घेतो कोण? साखर कारखान्याच्या संदर्भात कारखाना चालक म्हणतात शासनाचे धोरण चुकीचे असल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. तथापि हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. परंतु मधुकर सह. साखर कारखान्याला जिल्हा बँकेने सहकार्य केले तर तो कारखाना सुरू होऊ शकतो एवढे मात्र निश्‍चित.

समन्वयाची भूमिका तसेच मधला मार्ग काढला नाही तर कारखाना मोडित निघण्याची भीती!
* वसंत सह. साखर कारखाना ताब्यात घेतले त्याचे काय झाले?
* जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार की नाही?
* यापूर्वी बँकेचे भाडेतत्वावर देण्यासाठी तत्वत: मान्यता का दिली?
* शेतकऱ्यांना एफआरपीचे 17 कोटी दिल्याशिवाय क्रशिंगला परवानगी मिळेल कशी?
* कर्जबाजारी चोसाका कारखान्याप्रमाणे सेटलमेंट होणार नाही का?
* साखर विक्रीतून मिळालेल्या 20 कोटी रूपयांवरील स्थगिती उठवून मार्ग काढावा.

समन्वयाच्या भूमिकेतून मार्ग काढावा – शरद महाजन

मधुकर सह. साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचे 55 कोटी रूपयांचे कर्ज आहे. सदर कर्ज कारखाना भरायला तयार आहे. त्यासाठी जिल्हा बँक संचालक मंडळाने कारखाना भाडे तत्वावर देण्याची तत्वत: मान्यता दिली. त्यानंतर कारखान्याच्या वतीने भाडे तत्वावर देण्याची प्रक्रिया सुरू असतांनाच अचानक बँकेने कारखाना ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला ही बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तसेच कामगारात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी ज्या संस्थांनी सहकार्याचा हात पुढे केला होता त्यावर निश्‍चितच परिणाम होईल. म्हणून शेतकरी हित कामगारांचे हित साधून बँकेने आपले कर्जफेड करून मधला मार्ग काढावा तरच कारखाना वाचेल अशी प्रतिक्रिया मधुकर सह. बँकेचे चेअरमन शरद महाजन यांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी बँकेचा निर्णय – देवकरअप्पा

मधुकर सह. साखर कारखान्यावर 55 कोटी रूपयांची जिल्हा बँकेच्या कर्जाची थकबाकी आहे. कर्ज परतफेड करू शकत नसल्याने गेल्या 3 वर्षापासून साखर कारखाना बंद आहे. कारखान्यातील कामगार देशोधडीला लागलेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहे. साखर कारखाना बंद असल्याने शेतकरी ऊसाचे उत्पादन घेणे बंद केले आहे. तथापि केळीच्या पिका संदर्भातही केळी उत्पादनांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे बँकेतर्फे कारखाना ताब्यात घेऊन तो भाडेतत्वावर देणे. भाड्याच्या आलेल्या पैशातून बँकेच्या कर्जाचे हप्ते पूर्ण झाले की पुन्हा बँकेकडून सदर कारखाना संचालक मंडळाच्या सुपूर्द करण्यात येईल. यामागे बँकेचा शुध्द हेतू आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.