द्रव्य, क्षेत्र, काल, भाव यातून पुण्यकर्म वाढवा – डॉ. प‌दमचंद्र मुनी

0

प्रवचन सारांश 25/08/2022

श्रीकृष्ण आणि देवकी यांच्या बद्दल चरित्र सांगुन ‘देवकी रानी का झूरणा’ ही रचना सामुदायिकपणे म्हटली गेली. या रचनेत देवकीला सात नंदन झाले परंतु त्या सर्वांच्याप्रती आई म्हणून जे कर्तव्य करायचे होते, लाड-कोड, पालन-पोषण करायचे होते ते करता आले नाही. याबाबत मनात टोचणारी भावना या रचनेत मांडलेली आहे. श्रावक-श्राविकांच्या भरगच्च गर्दीत अंतगड सूत्र वाचन व प्रवचन कार्यक्रम झाला.

पर्युषण पर्वाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. पदमचंद्र मुनी यांनी प्रवचनात सांगितले की, काळाच्या ओघात जैन आगम शास्त्र 84 वरून केवळ 32 राहिलेले आहेत. प्रत्येक क्षणी संस्कृति बदलत आहे. ज्या मुंबईच्या विकासामध्ये पारशी लोकांची महत्त्वाची भूमिका होती त्यांची संख्या किती राहिली आहे ? तद्वतच जैन लोकसंख्या, संस्कृती यामध्ये कमालीचा बदल होत चालला आहे ही चिंताजनक परिस्थिती आहे.

‘द्रव्य’, ‘क्षेत्र, ‘काल’ आणि ‘भाव’ हे चार प्रकार आणि कर्मबंध यांचा संबंध स्पष्ट करताना कंसचे उदाहरण दिले. जेव्हा पाप अत्यंत उच्च कोटीला पोहोचलले असते त्यावेळी पुण्यात्मा जन्मास आलेला असतो. त्या आत्म्याच्या माध्यमातून पापाचा नाश करण्यात येतो. कंसचा अत्याचार अत्यंत जास्त झाला होता. त्याच वेळी श्रीकृष्ण जन्माला आले. ते जन्मले कुठे ? वाढले कुठे ? शेवटी श्रीकृ‌ष्ण वासुदेव यांनी कंसचा अंत केला. ज्या कुलात श्रीकृष्ण, बलराम वासुदेव आहे त्याबाबत मुळीच चिंता करायची नाही. आगम शास्त्रात जीवनातील अनेक गोष्टींचा समावेश आहे. वास्तुशास्त्र, 72 कला, 64 कला इत्यादीचे खरे ज्ञान त्यात दिलेले आहे त्या शास्त्राचा, ज्ञानाचा अत्यंत बारकाव्याने अभ्यास करायला हवा, व्यवस्थित समजून घ्यायला हवे. असेही प्रवचनात सांगण्यात आले.

जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्ट्घर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. या अंतर्गत पवित्र अशा पर्युषण पर्वाचा आरंभ झालेला आहे. आगम शास्त्रामध्ये श्रीकृष्ण वासुदेव यांच्या संदर्भात असलेल्या अनेक बाबी सांगण्यात आल्या. आपली द्वारकानगरी वसविण्यासाठी समुद्राकडे श्रीकृष्ण यांनी जागा मागितली. त्यासाठी देवतांची कशी मदत झाली याबाबत आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीत सांगितले. पर्युषण पर्वाच्या या काळात तप, ध्यान, आराधना करून आपली पुण्यवाणी वाढवावी असे आवाहनही डॉ. पदमचंद्र मुनी यांनी प्रवचनातून केले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.