राज्यात 1 फेब्रुवारीपासून रंगणार तमाशाचा फड

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना आपत्तीमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध घातले होते, काही प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नियमांमध्ये शिथिलता आणली होती. राज्यातील लोककलावंतांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील तमाशा फड 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यात तमाशा सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती.

राज्यात तमाशा फड सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती रघुवीर खेडकर यांच्याकडून मिळाली होती. यानंतर आता सरकारने राज्यात तमाशा सुरू करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोककलावंतांनी मोठा दिलासा मिळणार आहे.

अजित पवार यांनी पहिल्या भेटीत लोककलावंतांना राष्ट्रवादी हेल्पलाइन कडून १ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. प्रत्येकी कलावंताला 3 हजार रुपये देण्याचे शरद पवार यांनी कबूल केले त्यानंतर अजित पवार यांनी 1 फेब्रुवारीपासून तमाशा कार्यक्रमाला परवानगी देत असून त्याच दिवशी आम्ही जीआर काढू असे सांगितले. त्याचप्रमाणे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील समंती दिली. अशा प्रकारे तीन महान व्यक्तींनी लोककलावंतांना मोठा दिलासा दिला, असे अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी सांगितले.

तमाशा म्हणजे लावणी. महाराष्ट्रातील लोकनृत्यातील हा प्रमुख आणि प्रसिद्ध प्रकार आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्यात तमाशाचे फड रंगत आहे. मात्र कोरोनाच्या संपूर्ण दोन वर्षात तमाशाची मागणी कमी झाली. अनेक ठिकाणच्या यात्रा बंद झाल्या. कलावंतांना सुपाऱ्या मिळणे बंद झाले. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना तमाशावरील बंदी काही उठण्याचे नाव घेत नव्हती. या काळात लोककलावंत आर्थिक अडचणीत सापडले होते. त्याचप्रमाणे तमाशाचे संपूर्ण साहित्य वापरात न आल्याने ते खराब होण्याच्या वाटेवर आले. अनेक वर्षांची परंपरा असलेला तमाशा पुन्हा एकदा उभारण्यासाठी लोककलावंत पुढे आले. अखेर तमाशावरील बंदी उठवून 1 फेब्रुवारीपासून राज्यात तमाशाचे फड रंगताना दिसतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.