जळगाव होणार मंत्र्यांचा जिल्हा !

लता सोनवणेंचे नाव चर्चेत : चिमणआबांकडूनही फिल्डिंग

0

जळगाव (दीपक कुळकर्णी) लोकशाही न्युज नेटवर्क 

महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून तशा हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करुन अनेकांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचे नाव जिल्ह्यातून आघाडीवर असून पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटीलही फिल्डिंग लावून आहेत. राज्य मंत्रिमंडळात नंबर लागला तर जळगावला मंत्र्यांचा जिल्हा म्हणून संबोधले जाणार आहे. श्रीमती सोनवणे किंवा श्री. पाटील या पैकी कुणाचाही नंबर लागला तर जिल्ह्याला पाचवा मंत्री मिळणार आहे.

महाविकास आघाडीचे सरकार उलथवून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले मात्र या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्यास मुहुर्त सापडत नव्हता. आता विधानसभा निवडणुका तोंडावर असून काही नाराज आमदारांची नाराजी दूर करुन त्यांना खूश करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीसांकडून होणार आहे. तर ज्या मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे तेथे मंत्रीपद देण्यावर भर आहे. अवघ्या चार महिन्यावर विधानसभेचा बिगुल वाजणार असला तरी मंत्रिमंडळ विस्तार करण्यावर महायुतीचे एकमत झाले आहे.

 

लताताईंच्या नावाची चर्चा

चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून लोकसभा निवडणुकीतही मतदारसंघातून भाजपाला भरभरुन मते मिळवून दिली आहेत. कोळी समाजाचे त्या प्रतिनिधीत्व करीत असून त्या समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचा मंत्रीपदासाठी विचार होत आहे. माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी देखील चांगल्या प्रकारे कामे केली असून ते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्ती आहेत.

 

चिमणआबांकडून फिल्डिंग

मराठा समाजाला खूश करण्यासाठी मराठा चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार आहे. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत ज्येष्ठ असून ज्येष्ठतेनुसार त्यांच्या नावाचा विचार होवू शकतो. मंत्रीपदासाठी ते वरिष्ठांकडे फिल्डिंग लावून असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.