शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे तरुणाचा मृत्‍यू

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमळनेर (Amalner) तालुक्यातील कन्हेरे येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांचा शॉक लागून विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू (Death of a farm laborer) झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तरुण शेतमजुराच्या मृत्यूला महावितरण (MSEDCL) कंपनीचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

फापोरे (ता. अमळनेर) येथील राहुल हिलाल भिल (Rahul Hilal Bhil) (वय १८, हा शेतमजूर कन्हेरे, ता. अमळनेर) येथील रतीलाल लोटन पाटील यांच्या शेतात पिकांना खत टाकण्यासाठी गेलेला होता. या शेतात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत शेतमालकासह शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगूनही त्यांनी त्याची दखल घेतली नव्हती.

शेतमजूर राहुल भिल हा पिकांना खते देत असताना लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांजवळ पोचला. अनवधानाने तो सरळ उभा राहताच त्याचा या तारांना स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जबर शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अमळनेर पोलिसात (Amalner Police) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

राहुल हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. शिवाय त्याच्या परिवारातील एकटा कमवता होता. तो गेल्याने त्याचे कुटुंबीय अक्षरशः उघड्यावर पडले आहे. या घटनेमुळे फापोरे गावात हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान, घडलेल्या घटनेला महावितरणचे दुर्लक्ष सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून लोंबकळणाऱ्या वीज तारा उंच करण्यासंदर्भात दखल न घेणाऱ्या वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. मयत राहुलच्या कुटुंबीयांची परिस्थिती पाहता, त्यांना महावितरण कंपनीसह शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.