ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; खाशाबा जाधव (कुस्ती)

0

लोकशाही विशेष लेख

मराठमोळ्या खाशाबांचं आयुष्य अत्यंत प्रेरणादायी आहे. ऑलिम्पिकमध्ये (Olympics) स्वतंत्र भारताला खऱ्या अर्थाने पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो. खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर या खेडेगावात झाला. कुस्तीच्या खेळात त्यांची ख्याती होती. १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रीचर्ड (Norman Pritchard) यांनी वैयक्तिक खेळात दोन रौप्य पदके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. हे एकमेव ऑलिंपिक पदक विजेते होते की ज्यांना भारत सरकारने पद्म पुरस्कार दिलेला नाही. त्यांनी त्यांचा सराव अत्यंत वाईट परिस्थितीत सुरु ठेवला होता. त्यांची दुरावस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्यांना १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकपूर्वी मार्गदर्शन केले.

खाशाबा त्यावेळी विद्यार्थी दशेत होते, पण अभ्यासू होते. स्पर्धेचा अंदाज त्यांना लंडनमध्येच आलेला होता. आता स्पर्धा जिंकण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. किरकोळ शरीरयष्टीचे खाशाबा बँटमवेट (५२ किलो) या तळाच्या वजनी गटात फ्री-स्टाईल कुस्ती खेळत. त्यांचा स्टॅमिना असा की ते अव्याहत खेळू शकत होते. अंगभूत हुशारीने त्यांनी स्वत:ला मॅटसाठी तयार केलं. पैशाची जमवाजमव या विषयाने मात्र त्यांना थकवलं. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकसाठी त्यांना पैसे हवे होते. यावेळी त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य खर्डीकर यांनी राहतं घर गहाण टाकून सात हजार रुपये उभे केले. एका बँकेकडून सहा हजारांचं कर्ज घेतलं आणि त्यातून ही हेलसिंकी वारी शक्य झाली. तिथे त्यांनी कांस्य पदक जिंकल्यावर मात्र गावकऱ्यांनी कऱ्हाडपासून जन्मगाव गोळेश्वर पर्यंत १५१ बैलगाड्यांची मिरवणूक काढली होती.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, खाशाबा जाधव यांना २००० मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी, जळगाव
संपर्क : ७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.