खामगाव न.प.आरोग्य विभागात महाघोटाळा !

साहित्य खरेदी मोठी; मात्र प्रत्यक्षात वाणवा

0

खामगाव (गणेश भेरडे), लोकशाही न्युज नेटवर्क 

 

अमरावती विभागात राजकीय बळावर स्वच्छतेचा अव्वल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खामगांव नगर परिषदेच्या दिव्याखाली मात्र अंधार असल्याचे दिसून येत आहे. शहरात साफसफाईच्या संदर्भात ओरड होत असून न. प. च्या आरोग्य विभागाचे धिंडवडे प्रसार माध्यमातून निघत आहे. अशातच माहिती अधिकार कायद्या अंतर्गत न. प. आरोग्य विभागातील साहित्य खरेदीची मागील 4 वर्षाची माहिती मागितली असता अफलातून माहिती समोर आली आहे. यावरुन न. प. आरोग्य विभागात साहित्य खरेदीत महाघोटाळा झाल्याचे दिसून येत आहे.

याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरुन चौकशी होणे गरजेचे झाले असुन खामगांव वासियांना अस्वच्छतेचा सामना करण्यास भाग पाडणा­या व सफाई कामगारांना वेठीस धरणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

खामगांव नगर परिषदेला 31 मार्च 2023 नंतर पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे शहर वासियांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. जवळपास 6 महिन्यानंतर डॉ. प्रशांत शेळके यांच्या रुपाने पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले. त्यांनी आल्या आल्या शहरातील प्रभागात फेरफटका मारुन आपल्या कर्तव्यदक्षतेची चुणूक दाखविली खरी, पण ती जास्त वेळ टिकू शकली नाही असे दिसून येते. कारण शहरातील अस्वच्छतेबाबत शहरवासियांकड़ून ओरड होत आहे. मात्र प्रत्यक्षात लक्ष देण्यास कोणीच तयार नसल्याचे दिसून येत आहे.

खामगांव न. प. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचा कारभार आरोग्य पर्यवेक्षक सौ. प्राजक्ता पांडे, आरोग्य निरीक्षक ए. आय. निळे, प्रभारी आरोग्य निरीक्षक ललित अहेरवाल, घंटागाडी व्यवस्था एस.आर. तंबोले व ठेेकेदार सागर पाटील पाहत आहेत. तरी सुध्दा शहरात साफसफाई बाबत ओरड होत आहे. अशातच सफाई कामगार त्यांच्याकडे साहित्य नसल्याचा आरोप करीत आहे. यामुळे न. प. कडून माहिती अधिकारात मागील 4 वर्षाची माहिती मागितली असता न. प. ने अव्वाच्या सव्वा भावात सर्व अत्यावश्यक साहित्याची खरेदी करुन वार्ड प्युन व सफाई कामगारांना वाटप केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे न. प. च्या आरोग्य विभागात महाघोटाळा झाल्याचे दिसून येत आहे.

माहितीची कागदपत्रेही मॅनेज ! स्मशानभूमीला झाडू दिले की देणार

माहिती अधिकारात दिलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता ही माहिती सुध्दा मॅनेज करुन दिल्याचे दिसून येते. कारण यामध्ये 23 डिसेंबर 2024 रोजी स्मशानभूमि स्वच्छता अभियान अंतर्गत 30 झाडू देण्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय इतरही आक्षेपार्ह बाबी दिसून आल्या. एकंदरीत न. प. आरोग्य विभागाने मागील 4 वर्षात मोठी साहित्य खरेदी केली. पण प्रत्यक्षात मात्र सफाई कामगारांकडे साहित्याची वाणवा असल्याने नेमका खरा प्रकार काय? यासाठी साहित्य खरेदी व वाटपाची चौकशी होणे सुध्दा गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.