सातत्य व आज्ञाधारकता ही क्रीडा नैपुण्याची गुरुकिल्ली- रोहन श्रीरामवार

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

सरावातील सातत्य तसेच गुरु व पालकांप्रती असलेली आज्ञाधारकता हे गुण खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कारकिर्दीत सर्वोच्च स्थानी घेऊन जातात”
असे प्रतिपादन एरोबिक जिम्नॅस्टिक्स खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त रोहन श्रीरामवार यांनी एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये आयोजित खेळाडू व पालकांसाठीच्या परिसंवादात बोलताना केले. आपल्या क्रीडा नैपुण्यतेच्या बळावर महावितरण कंपनीत यशस्वी कारकीर्द घडविणारे रोहन श्रीरामवार हे महावितरण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे आले होते.

त्यांच्या अनुभवाचा उपयोग खेळाडू व पालकांना होण्याच्या दृष्टीने विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी खेळातील सहभागाचे महत्त्व, त्यामुळे जीवनात होणारे फायदे तसेच खेळाडूंनी कोणत्या बाबींवर काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये बोलताना त्यांनी खेळाडूचा सराव, आहार नियोजन, एकाग्रता अशा विविध विषयांवर खेळाडूंशी हितगुज केले. मोबाईलचा अतिरेक या बाबतीत त्यांनी प्रकर्षाने खेळाडूंसोबतच पालकांचे देखील कान टोचले. तसेच उपस्थित खेळाडू व पालकांच्या विविध प्रश्नांना अनुसरून दिलखुलास चर्चा केली. या परिसंवादातील मार्गदर्शनाबद्दल एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. निलेश जोशी यांनी रोहन श्रीरामवार यांचे आभार मानले.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.