पाषाणाचा देव केला, एके दिवशी भंगोनी गेला..

0

करुणाष्टक- 20

बहुदा देवालयें हाटकाचीं I
रसाळ कळा लाघवें नाटकाचीं II
पुजा देखितां जाड जीवीं गळालों I
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II

परमार्थ मार्गामध्ये प्रगतीसाठी अनेक प्रकारची साधने सांगितली जातात. अनेक प्रकारचे याग आहेत. तपश्चर्यादि अनुष्ठाने आहेत. तीर्थयात्रा आहेत. अनेक प्रकारच्या दैवतांच्या निरनिराळ्या उपासना आहेत. या उपासना तंत्राचा शरीरावर, मनावर ताण पडतो व सर्वनाश होण्याचे भय असते. त्यामुळे देवाचा खरा लाभ तर दूरच राहतो. नाना प्रकारची व्रते, उद्यापने, अनुष्ठाने यांनी चित्तशुद्धी होत नाही. सगळी साधने शास्त्रोक्त रित्या जमविणे फारच महाग पडते. कष्टाचे पडते. स्वतःला मंत्रतंत्र कळत नसतात. या गोष्टीने फक्त धार्मिक म्हणून मिळणारा लौकिक तेवढाच उरतो. पण जनरीत ही अशीच असते.

दानशुर, महात्मे यांनी दिलेल्या देणगीतून अनेक भक्त लोकांनी देवालये उभी केलेली असतात. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सामान्य भक्तांचा बाजार भरलेला असतो. वर्षानुवर्ष हे चालते. सोन्याचा, चांदीचा देव बनून जातो इतके वैभव असते. भजन, किर्तन, गायन याद्वारे भक्त भगवंतांना आळवताना दिसतात. हे सर्व करीत असताना भगवंताची अर्चना अत्यंत भव्य स्वरूपात केलेली असते. समर्थांनाही हे मान्य आहे. बहुजन समाजास किर्तन हाच एक उपाय आहे. या किर्तनात आवडीने परमेश्वर वर्णावा, त्याचे यश, किर्ती, प्रताप गावा कारण यानेच भगवंतांचा आत्मा संतुष्ट होतो. टाळ, मृदुंग, संगीत, नृत्य प्रबंध, घाटे, मुद्रा, छंद इत्यादींचा वापर किर्तनात करून ‘विनोद प्रसंग’ करावे असेही समर्थ सांगतात. श्री सद्गुरु दासगणू महाराजांनी आपल्या एका फटक्यात अशा धार्मिकतेचे वर्णन खोचकपणे केले आहे ते म्हणतात,

“भाळी टिळे ढळढळीत चंदनी लावूनी चतुराईचे I
जणू का सिग्नल आगगाडीचे II

उपकरण्याला बघून भारता जरी भगवान किरीटी I
तरीका तांबट थोडे हरी II

चांदी सोने पाचु-हिर्‍याला जरी भगवान भाळता I
तरी का सराफ हटिं बैसता ? II

उज्वल तांब्या, आसनं लोकरी, घणघण वाजे घाट I
पूजेचा लांब वरी बोभाट II

गुलाब, बुक्का, अबिर, चंदन, अष्टगंध अर्गजा I
पाहिजे म्हणती गरुडध्वजा II

जाई-जुई नी बकुल मालती निशिगंधाचा तुरा I
हारमधि निव्वळ बटमोगरा II

निरांजने ती दहावीस जळती नाश तुपाचा खरा I
बदामी नैवेद्याला शिरा II

अशी पूजेचे करी कवाईत बहुरुप्याचे परी I
भक्तीचे नाव नसे अंतरी II”

पवित्र सोवळे, षोडोपचार पूजा, नंदादीप, महानैवेद्य अशी सशास्त्र पुजा नेहमी अनेक मंदिरात चालू असते आणि नकळत आपण त्या जगताच्या स्वामीला मंदिराच्या गाभाऱ्यात सीमित केले जाते. सर्व विश्वाला अन्न पुरवणाऱ्याला महानैवेद्य अर्पण केला जातो. श्री समर्थ हे सर्व पाहतात आणि वेगाने तेथून निघून जातात. स्वामी दयानंद सरस्वती म्हणत, “अरे ! त्या परमात्म्याने विश्व निर्माण केले. या भगवंताला मूर्तीत पहाणे म्हणजे राजवाड्यातून त्याला एखाद्या झोपडीत काढण्यासारखे आहे”. पण त्या काळाची ती गरज होती म्हणा. स्वामी रामदासांनी इतर साधनांबरोबर ‘मूर्तीपुजा’ या साधनेने भयग्रस्त समाजाला निर्भय व्हायला शिकवले.

राम व मारुती या दैवतांकडे मन आकर्षित करून संघटनेला आवश्यक अशी एकसूत्रता निर्माण केली. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीच्या आग्रहात, महर्षी कर्वे यांच्या विधवा विवाहात, महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात जसे तेज साठलेले होते तेच रामदासांनी सुरू केलेल्या राम, मारुतीच्या मूर्ती पुजेत होती. त्यांनी मठस्थापना करणे, विहीरी खणणे, धर्मशाळा बांधणे इत्यादी कृत्यांनी देवाची पूजा करता येते ही धनवंतांना दिशा दाखवून दिली. उज्ज्वल भविष्याचा विश्वास समाजमनात जागृत केला. पण मूर्ती पुजेचे विशुद्ध स्वरूप समाजासमोर मांडताना, “पाषाणाचा देव केला, एके दिवशी भंगोनी गेला, तेणे भक्त दुखावला आक्रंदे” अशा स्पष्ट शब्दांत टिकाही केली.

स्वामी रामदासांनी मूर्ती पुजेचे कार्य हाती घेतले परंतु मूर्तीपुजा हे जीवनाचे साधन नाही हे त्यांनी वारंवार बजावून सांगितले. विमलज्ञानाची तळमळ मनात बाळगुनच कर्मकांड उपासना करीत राहावी याची पुन्हा पुन्हा जाणीव दिली. स्वतःला मिळालेल्या विमलज्ञानाचा लाभ समाजाला करून द्यावा असे त्यांचे मत होते. “रामराज्याची” संकल्पना साकार व्हावी व एक उत्साहाने सळसळता समृद्ध व परस्पर विश्वासावर भक्कम साधलेला समाज हे त्यांचे स्वप्न होते.

“देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जिवलगांसाठी तुटी सर्वही अपावे शेवटी, प्राण तोही वेचावा I”

अशा भक्तीने स्वतः समर्थांनी रामरायाची सेवा केली. म्हणूनच ते म्हणतात, धनाढ्य लोकांनी केले तशी भजन, किर्तने मी करू शकणार नाही. सर्वसंग सोडलेला मी दास आहे. मी फक्त माझा जीवभाव तुला देऊ शकतो. तू कृपा करशील ना ?

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.