कजगाव येथे उष्मघाताचा दुसरा बळी….

0

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कजगाव ता भडगाव येथे उष्मघाताने दुसरा बळी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिवसेंदिवस उन्हाचे तापमान वाढले आहे. उन्हाचा पारा ४५ अंशा पर्यंत जाऊन पोहचला आहे. त्यामुळे उष्मघाताचे (Heatstroke) प्रमाणही वाढले आहे. कजगाव येथे चार दिवसात उष्मघाताचे दोन बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कजगाव परीसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. विराट गोपीचंद मालचे ह्या आठ वर्षीय बालकाचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विराट हा दिनांक १५ रोजी संध्याकाळ पर्यंत खेळत होता मात्र संध्याकाळी अचानक त्याला उलट्या व अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे दिनांक १६ रोजी त्याला चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्याचा सल्ला दिला.

धुळे (Dhule) जात असतांनाच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. अगदी आठ वर्षाच्या बाळाचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कजगाव गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. विराटच्या अशा अचानक जाण्याने कुटुंब व नातेवाईकानीं हृदय हेलावून टाकणारा आक्रोश केला आहे. कष्टकरी आदिवासी कुटूंबातील बालकाचे असे अचानक जाण्याने समाजमन पुरते सुन्न झाले आहे. मागील चार दिवसांपूर्वी अक्षय सोनार ह्या एकोणतीस वर्षीय तरुणाचा मृत्यूला काही कालावधी लोटत नाही तोच एका बालकाचा मृत्यू झाल्याने कजगाव परिसर सुन्न झाला आहे. एकामागून एक असे दोन बळी गेल्याने नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे.
मयत विराटच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे त्याच्यावर रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.