लोकशाही न्यूज नेटवर्क
मुझफ्फरनगरच्या (Muzaffarnagar) बालाजी मंदिराकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांसाठी तुघलकी फर्मान जारी केले आहे. या आदेशानुसार पुरूष-महिला भाविकांनी हाफ पँट, बर्म्युडा, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फाटलेल्या जीन्स घालून मंदिरात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणत्याही महिलेने अथवा तरूणीने असे कपडे घातले असतील तर त्यांनी मंदिरात प्रवेश करू नये. अशा व्यक्तींना बाहेरूनच दर्शन घ्यावे. अशा सूचनावजा आदेश मंदिर समितीने मंदिराच्या आवारात व बाहेर लावले आहेत. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर शहरातील प्रसिद्ध बालाजी मंदिराच्या या आदेशामुळे खळबळ माजली आहे.
तसेच या सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्यात येईल असेही समितीने स्पष्ट केले आहे. एखादी व्यक्ती अव्यवस्थित अथवा अयोग्य कपडे घालून मंदिरात आल्यास त्या व्यक्तीला दंड ठोठावला जाईल. महिला आणि मुलींना साधे कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करता येणार आहे. बालाजी मंदिरातर्फे ही सूचनावजा फर्मान जारी करण्यात आल्यानंतर हे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मंदिर समितीच्या या पोस्टवर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या आदेशाची एक प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मंदिर परिसरात जीन्स, स्कर्ट टॉप आणि फाटलेले कपडे घालून मंदिरात येऊ नका, असे लिहिले आहे.