लोकशाही न्यूज नेटवर्क
नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात सध्या ‘इलेक्ट्रिक’ हा चर्चेचा शब्द आहे. शेकडो नवीन इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या ग्राहकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तर टेस्लादेखील भारतात दाखल होत आहे. त्याचबरोबर व्हिएतनामच्या आघाडीच्या ऑटो कंपनीनेही भारतात येण्याचे संकेत दिले आहेत. परदेशी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय वाहन कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भारतातील ईव्ही क्षेत्रात नोकऱ्यांचा पूर येण्याचे संकेत आहेत. असा अंदाज आहे की सन 2030 पर्यंत म्हणजेच येत्या काही वर्षांत दर मिनिटाला 16 लोकांना नोकऱ्या मिळू शकतील.
लिंक्डइनच्या ग्लोबल ग्रीन स्किल्स रिपोर्ट 2023 नुसार, ऑटो उद्योगात ग्रीन स्किल्स आत्मसात करण्याच्या बाबतीत भारताने आधीच अनेक देशांना मागे टाकले आहे. भारताने गेल्या पाच वर्षांत किमान एक इव्ही स्कीलसह वाहन उद्योगातील कर्मचारी 40 टक्क्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे अमेरिका, मेक्सिको, कॅनडा आणि अनेक युरोपीय देश या बाबतीत भारतापेक्षा खूप मागे पडले आहेत. येत्या काही वर्षांत ग्रीन स्किल्स कामगारांची मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. विविध उद्योगांचे नेते विविध स्तरांवर इव्ही क्षेत्रात रोजगार निर्मितीचा अंदाज व्यक्त करत आहेत.
रँडस्टॅड इंडियाच्या प्रोफेशनल सर्च अँड सिलेक्शनचे संचालक संजय शेट्टी म्हणाले की, 2030 पर्यंत ईव्ही क्षेत्रात 10 दशलक्ष किंवा 1 कोटी प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील आणि 50-55 दशलक्ष किंवा 5.5 कोटी अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. दोन्ही एकत्र केल्यास 6 कोटींहून अधिक लोकांना रोजगार मिळू शकतो. म्हणजेच येत्या काही दिवसांत दर मिनिटाला 16 जणांना नोकऱ्या मिळू शकतात. मनु शर्मा, एव्हीपी एचआर, हिरो इलेक्ट्रिक यांनी ईटीशी बोलताना सांगितले की, मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी ईव्ही उद्योगाला तातडीने पाच ते 10 कोटी लोकांची आवश्यकता असेल.
रेव्हफिनचे सीईओ आणि संस्थापक समीर अग्रवाल म्हणाले की, 2030 पर्यंत सुमारे 20 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होतील. ज्यामध्ये R&D पासून उत्पादन, चार्जिंग इन्फ्रा आणि स्किल टेक नोकऱ्यांपर्यंत अनेक पदांचा समावेश केला जाईल. रँडस्टॅडचे शेट्टी म्हणाले की 2030 पर्यंत देशांतर्गत ईव्ही मार्केटमध्ये 45-50 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ते पुढे म्हणाले की, आम्हाला आशा आहे की भारतातील वार्षिक ईव्ही विक्री 10 दशलक्ष युनिट्सपेक्षा जास्त होईल आणि त्यातून सुमारे 8-10 दशलक्ष प्रत्यक्ष आणि 50-55 दशलक्ष अप्रत्यक्ष नोकर्या निर्माण होतील. नजीकच्या भविष्यात कुशल व्यावसायिक आणि सुमारे 15-20 लाख कर्मचाऱ्यांची मागणी वाढत आहे व यामध्ये टॅलेंटची कमतरताही त्यांनी नमूद केली.