मनपा अंतर्गत उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक, खोल्या व इतर सुविधा त्वरित उपलब्ध करून द्या – मुस्लिम शिष्टमंडळाची मागणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहर महानगरपालिका अंतर्गत जळगाव शहरात एकूण १० प्राथमिक व २ माध्यमिक शाळा सुरू असून या प्राथमिक शाळा दोन समूह केंद्रामार्फत चालवल्या जातात या शाळेतील पटसंख्या विचारात घेता एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३८९३ आहे व तेथे फक्त  ९१ शिक्षक उपलब्ध आहेत. वास्तविक तेथे १०९ शिक्षक आवश्यक आहे. १८ शिक्षक आवश्यकतेपेक्षा कमी आहे.

तसेच पंधरा वर्ग खोल्या सुद्धा कमी असल्याने त्याची त्वरित पूर्तता करावी या मागणीसाठी जळगाव शहरातील वरिष्ठ उर्दू पत्रकार अली अंजुम रिझवी, मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, स्वातंत्र सेनानी मीर शुक्रल्ला प्रतिष्ठानचे मीर नाजीम अली, यांनी महापौर जयश्री महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना उपलब्ध माहितीच्या अधिकारातील तसेच शासकीय परिपत्रकासह सविस्तर निवेदन सादर केले.

महापौर जयश्री महाजन यांनी सदर निवेदनावर शिष्टमंडळाशी चर्चा करतांना त्या एक शाळेच्या मुख्याध्यापिका असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की ,जळगाव शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये अपूर्णता असताना सुद्धा त्याबाबत पूर्तता करण्यात का आली नाही? परंतु मी सदर पूर्तता करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

 निवेदनातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे :-

१) जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत १०प्राथमिक व २ माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या बघितली असता १८ शिक्षक कमी असल्याने त्वरित भरती करावे.

२) विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेपेक्षा १५ वर्ग खोल्या कमी असल्याने ज्या शाळेत वर्ग खोल्या कमी आहे त्याची त्वरित पूर्तता करण्यात यावी

३) शाळांमधील शिक्षक संख्या, पदवीधर शिक्षक संख्या, विशेष शिक्षक संख्या आणि मुख्याध्यापकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे तेथे त्वरित त्यांची नियुक्ती करण्यात यावी.

४) मनपा सुरू असलेल्या ३६ व ५६ शाळेतील सातवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्या ठिकाणी त्वरित आठवीचा वर्ग सुरू करण्यात यावा.

५) जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील उर्दू प्राथमिक शाळेत येणाऱ्या वर्षांपासून प्रत्येक शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात यावे.

सनदशीर मार्गाने तीव्र लढा देणार

सदर मागण्या बाबत मनपा प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने त्रिवस्वरूपाचे आंदोलन जळगावकर एकत्रितपणे करतील व वेळप्रसंगी न्यायालयात सुद्धा जाण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.