शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  राज्यात जलयुक्त शिवार 2.0 अभियानाला गती मिळणार आहे. यासाठी राज्यात जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला, असेही त्यांनी सांगितलं. मुंबईतील हॉटेल ताज येथे झालेल्या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रवीशंकर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला. जलयुक्त शिवार २ मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली.

या जिल्ह्यात कामे करणार

राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर,नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा एकूण २४ जिल्ह्यातील ८६ तालुक्यात जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची आहे. याचबरोबर जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेत तळे कामे होणार आहेत. यासाठी तीन वर्षांचा कालावधी असेल.

राज्य सरकारच्या कृषी विभागाशी झालेल्या करारानुसार राज्यात व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने आणि खतांवर आधारित पारंपरिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करेल. तसेच ‘धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झालेला आहे. त्यामुळे तेथील साठवणूक क्षमता वाढविण्यावर शासन काम करत आहे. कॅन्सरसारखे रोग वाढत चालले आहे. त्यासाठी आपण सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या 22 हजार गावांमध्ये मोठं काम झालं. केंद्राने 2020 मध्ये जो अहवाल दिला, त्यात महाराष्ट्रातला वॉटर टेबल इतर सर्व राज्यांच्या तुलनेनेवर आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. यामध्ये अर्थातच आर्ट ऑफ लिव्हिंगचा सिंहाचा वाटा असून यामाध्यमातून विषमुक्त शेतीचा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम राबवून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.