तमाशात नाचणारा सहायक फौजदार निलंबित

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथे तमाशाच्या फडात नाचणारा सहायक फौजदार भटू वीरभान नेरकर याला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी दिली.

जळगावातील निवृत्ती नगर येथे मागील महिन्यात भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे, ता. जळगाव) या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व मनीष नरेंद्र पाटील (वय २२, रा.आव्हाणे, ता. जळगाव) या दोघांना अटक झाली.  दरम्यान या घटनेच्या काही दिवस आधी भूषण सपकाळे याच्या गावात तमाशाचे आयोजन केले होते. तेथे भटू नेरकर याच्यासह एका कर्मचाऱ्याने हजेरी लावली होती. ते दोघे तमाशाच्या फडात नाचल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य आढळल्याने एकाला निलंबित करण्यात आले असून दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. यात तथ्य आढळल्यास त्याच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.