धक्कादायक.. प्रियकराच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलाला संपविले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या अनैतिक संबंधाच्या आड येणार्‍या मुलास गळफास देऊन ठार मारले आहे. ती महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या मुलाला आईनेच मित्राच्या मदतीने जंगलात गळफास देवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय १४, रा. सावखेडा शिवार, जलाराम नगर जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. तर त्यांची आई मंगलाबाई विलास पाटील (वय ३५, रा. जलाराम नगर) आणि प्रमोद जयदेव शिंपी (वय ३८, रा. विखरण ता. एरंडोल) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.

याप्रकरणी फिर्यादीत नमूद केल्यानुसार विलास नामदेव पाटील हे चालक असून पत्नी मंगला पाटील आणि मुलगा प्रशांत पाटील यांच्यासह जलाराम नगरात वास्तव्याला आहेत. विलास पाटील हे खासगी वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, त्यांची पत्नी मंगला पाटील आणि प्रमोद शिंपी यांचे वर्षभरापासून सूत जमले होते. त्यांच्या अनैतिक संबंधांमध्ये मुलगा प्रशांत पाटील हा अडसर ठरत असल्याने त्याची आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांनी मुलाला १६ जानेवारी रोजी रावेर येथून कबुतर ठेवण्याचा पिंजरा घेवून येवू असे आमीष दाखवून प्रशांत याला त्याची आई मंगलबाई आणि प्रमोद हे दोन्ही सोबत घेवून मध्यप्रदेशातील बर्‍हाणपुर गावानजीकच्या जंगलात घेऊन गेले.

त्यांनी प्रशांत पाटील याला गळफास देवून झाडाला लटकावून दिले. तेथून ही महिला पुन्हा जळगावात घरी आली. इकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार प्रशांतचे वडील विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलीसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी तांत्रिक मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी तपासाला सुरूवात केली.

२६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पोलीसांनी संशयित आरोपी प्रमोद जयदेवर शिंपी याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यासाठी मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघांना अटक केली. पोलीसांनी बर्‍हाणपुर येथील जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला.

दरम्यान, मुलाचा खून करणार्‍या दोन्ही संशयित आरोपींना गुरूवार २७ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळणोर, भांडारकर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.