जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यात दिवसाढवळ्या तब्बल २० घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बिलवाडी गावातून मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून एकुण २० लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी आज बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदेत दिली. प्रविण सुभाष पाटील (वय ३०, रा. बिलवाडी ता.जि.जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गुप्त माहितीनुसार शोध
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील सार्वे येथे ३ दिवसांपूर्वी दिवसा चोरी झाली होती. या संदर्भात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स.फौ. विजयसिंह पाटील यांना मिळालेला गुप्त माहितीनुसार ही चोरी बिलवाडी गावातील प्रवीण पाटील यानेच केल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चौबे, स.फौ. विजयसिंह पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, संदीप साळवे, विजय पाटील, किरण चौधरी, सचिन महाजन, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील यांचे पथक रवाना झाले.
मुद्देमाल जप्त
दरम्यान संशयित आरोपी प्रवीण सुभाष पाटील याला त्याच्या गावातून मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अटक केली. त्याने सुरुवातीला आपण चोरी केले नसल्याचे सांगितले. नंतर खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. गेल्या दोन वर्षात त्याने आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात जाऊन दिवसाढवळ्या चोरीचे २० गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याच्याकडून १७३ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, १० लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, ९० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी असा एकूण २० लाख २९ हजार रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राजकारणी निघाला चोर
जिल्ह्यात ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. दरम्यान बिलवाडी गावाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी संशयित आरोपी प्रविण पाटील याने अपक्ष म्हणून उमेदवार उभा होता. त्यात केवळ ४० मतांनी पराभव झाला होता. काही वर्षांपूर्वी प्रवीण बेरोजगार होता आणि आता पैशांची उधळण करतोय, सरपंच होण्यासाठी त्याने निवडणुकीच्या दोन रात्रीतून १२ लाख रुपयांपर्यंत वाटप केल्याने सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले होते. गेल्या वर्षभरात गाव-तालुक्यासह, सार्वे (ता. पारोळा), डाम्हरुण (ता. चाळीसगाव) आणि नातेसंबंधातील गाव-खेड्यांमध्ये जाऊन तरुणांना आपल्या प्रभावी बोलण्यातून प्रभाव टाकत होता. सामाजिक कामाच्या नावाखाली ‘देवा’ या नावाने ग्रुप तयार केला होता. निवडणुकीत पराभव झाला तर त्याचा रुबाब कायम होता. या सर्व गोष्टींची कुणकुण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशन नजन पाटील यांना लागली. दोन दिवस पाळत ठेवून प्रवीणला ताब्यात घेतले.