“समाज कल्याण विभागाचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार  नाही”; ‘मास्वे’ अध्यक्ष प्रा अंबादास मोहितेंचा इशारा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

समाज कल्याण आयुक्त, पुणे यांनी अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वर्धा, श्रीमती एस आर एम समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर व समाजकार्य महाविद्यालय, कामठी यांची मान्यता रद्द करण्याचे काढलेले आदेश पूर्णतः बेकायदेशीर असून, भारतीय संविधान, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या तरतुदींचे तसेच नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाची पायमल्ली करणारे आहेत. समाज कल्याण विभागाचा असा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा “मास्वे” चे संस्थापक अध्यक्ष प्रा अंबादास मोहिते यांनी दिला आहे.

भैयाजी पांढरीपांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, नागपूर येथे मास्वेतर्फे आयोजित समाज कार्य महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सभेत ते बोलत होते. प्रा मोहिते पुढे म्हणाले की समाज कल्याण विभागाची कार्यपद्धती व कृती विद्यापीठाचे कुलगुरु तसेच  विद्या परिषद, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, अधिष्ठाता मंडल, स्थानिक चौकशी समिती, नॅक, आदीं प्राधिकरणांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारी व आकसपूर्ण अशी आहे. एकीकडे समाज कार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रगती योजना (कॅस), अर्जित रजा रोखीकरण, आश्वासित प्रगती योजना, डीसीपीएस, जीपीएफ ची खाती उघडणे, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व थकबाकी आदि प्रलंबित प्रश्न तसेच प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, समाजकार्य पदवीधर शैक्षणिक अर्हता असलेली विविध विभागातील पदे तातडीने भरणे आदि मागण्यांकडे डोळेझाक करायची व दुसरीकडे शुल्लक मुद्दे उपस्थित करुन, समाजकार्य महाविद्यालयांना, कर्मचारी व विद्यार्थ्यांना वेठीस धरायचे असे जे प्रकार सुरु आहेत ते अत्यंत निषेधार्ह आहेत. शासनाने समाज कल्याण विभागाच्या लहरी, मनमानी व भ्रष्ट कारभाराला तातडीने पायबंद घालावा. अन्यथा संघटनेला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असे प्रा. मोहिते यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमामधील तरतुदी, महाविद्यालयास संलग्नता व मान्यता,  सामाजिक न्याय विभागाचा २ फेब्रुवारी १९९९ चा शासन निर्णय, समाजकार्य महाविद्यालयीन व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका, कर्तव्य व जबाबदारी व इतर मुद्द्यांवर प्रा.मोहिते यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व समाज कल्याण विभागाच्या अन्यायकारक कारभाराविरुद्धच्या लढ्यात संघटना कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभी राहिल अशी ग्वाही दिली.

डॉ मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेमध्ये  प्रा. रुपेश कुचेवार, डॉ. विश्वनाथ राठोड, डाॅ. ममता ठाकुरवार, प्रा राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. रुबीना अन्सारी, डाॅ संजय पिठाडे, शंभरकर, डाॅ विलास बैले, डॉ.प्रमोद सातंगे यांनी समाजकार्य महाविद्यालयाबाबतची सद्यस्थिती आणि समाज कल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या अन्यायकारक कार्यवाहीबद्दल तीव्र शब्दात असंतोष व्यक्त केला व संघटनेने कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.

याप्रसंगी विचारपीठावर नागरिक शिक्षण मंडळाचे सहसचिव प्राचार्य रविन्द्र दुरगकर, नागरिक शिक्षण मंडळाचे सदस्य श्यामभाऊ देऊळकर, डाॅ विजय शिंगणापूरे, डॉ.दिलीप बारहाते, मास्वेचे महासचिव प्रा संजय फुलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनंत बर्डे, मास्वे संघटनेचे पदाधिकारी डॉ.राजेंद्र दीक्षित, डॉ. चंदू पोपटकर, डॉ मिलिंद सवई, डॉ विलास घोडे, प्रा नितेश मोटघरे, डॉ. केशव वाळके, डॉ तुळशीराम राठोड, प्रा. नरेश धुर्वे, प्रा रुपेश कुचेवार, शुभांगी टुले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेमध्ये फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, गडचिरोली, श्रीमती एस आर एम समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर, आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर, अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वडसा, आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा, अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वर्धा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा, मातोश्री अंजनाबाई मुंदाफले समाजकार्य नरखेड, समाजकार्य महाविद्यालय कामठी, तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय नागपूर, स्वामी विवेकानंद समाज कार्य महाविद्यालय नागपूर, ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय नागपूर, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय नागपूर, कुंभलकर सांध्यकालीन समाजकार्य महाविद्यालय नागपूर, पुरुषोत्तम थोटे समाजकार्य महाविद्यालय नागपूर, भैय्याजी पांढरीपांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर, ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालय उमरेड, दादाजी नानाजी चौधरी समाजकार्य महाविद्यालय मलकापूर, सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम, समाजकार्य महाविद्यालय, परभणी, समाजकार्य महाविद्यालय, अमरावती आदि महाविद्यालयातील जवळपास २०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभेला प्रत्यक्ष तर राज्यातील इतर समाजकार्य महाविद्यालयांचे प्रतिनिधी आभासी पध्दतीने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक प्रा संजय फुलकर यांनी केले. तर आभारप्रदर्शनाची जबाबदारी प्रा नितेश मोटघरे यांनी सांभाळली. सभेच्या यशस्वी आयोजनाकरिता बी पी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल वर्कच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.