जी. एच. रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र राज्य निवड फिडे बुद्धिबळ स्पर्धेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या हिरवाईने नटलेला परिसर, प्रशस्त सभागृह, राज्यभरातील दिग्गज व उदयोन्मुख खेळाडू व पदाधिकाऱ्यांचा सहभागात गुरुवारी फिडे नामांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत राज्यातील २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल व रायसोनी इस्टीट्युटचे कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांच्यातील प्रातिनिधिक लढतीने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा शिरसोली मार्गावरील जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या प्रशस्त भवनात ता. २० ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

ता. २० गुरुवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी अमन मित्तल, आयोजन समिती अध्यक्ष व रायसोनी इस्टीट्युटचे कार्यकारी संचालक प्रितमजी रायसोनी, श्रेयस रायसोनी, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दिक्षित, मुख्य पंच स्वप्नील बनसोड यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी या स्पर्धेसाठी या ठिकाणी खेळाडू सोबत त्यांचे पालक देखील आले आहे मुलांनी या गोष्टीचे भान ठेवावे की त्यांचे पालक त्यांच्यासाठी खूप परिश्रम घेत आहे. खेळाडूंनी देखील परिश्रम घ्यावे, आज त्यांच्यासाठी खूप सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचा लाभ घेऊन खेळाडूंनी आपले, आपल्या गावाचे, शहराचे व देशाचे नाव मोठे करावे असे आवाहन केले.

उद्घाटन कार्यक्रमानंतर जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या अत्याधुनिक भवनात ‘स्विस लीग’ पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली ही स्पर्धा २३ जुलैपर्यंत चालणार आहे. स्पर्धा ही खुली वयोगटासाठी ठेवण्यात आली असल्याचे जैन स्पोर्ट अकॅडमीचे अरविंद देशपांडे व रवींद्र धर्माधिकारी यांनी ही माहिती दिली. स्पर्धा ८ फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार असून या स्पर्धेतून खेळाडूंना आपले ‘रेटिंग’ वाढवण्याची व १६ ऑगस्ट पासून पुणेमध्ये आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून कामगिरी केलेले स्वप्नील बनसोड, सहाय्यक पंच प्रवीण ठाकरे, पोर्णिमा माने, अभिषेक जाधव, सागर साखरे, वासंती सरवडे यांनी जबाबदारी सांभाळली असल्याचे डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी १२० आंतरराष्ट्रीय फिडे नामांकित खेळाडू सहित २०५० रेटिंग प्राप्त नचिकेत पातुरकर (भंडारा), १९५९ रेटिंग प्राप्त श्रीराज भोसले (कोल्हापूर), १९४९ रेटिंग प्राप्त इंद्रजीत महेंद्रकर (संभाजीनगर), १८२१ रेटिंग प्राप्त महीर सरवडे यांच्यासह २०० खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते. सदर उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बियाणी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.