श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

अभंग -३

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म I
भेदाभेदभ्रम अमंगळ II धृ II
आइका जी तुम्ही भक्त भागवत I
कराल तें हित सत्य करा II१II
कोणा ही जिवाचा न घडो मस्तर I
वर्म सर्वेश्वरपूजनाचें II२II
तुका म्हणे एका देहाचे अवयव I सुखदुःख जीव भोग पावे II३II

अभंग क्रमांक ४६

जो धारण करतो तो धर्म. यासाठी चार आश्रमांची निर्मिती आहे. त्या आश्रमात तद्नुसार वर्तन करणे किंबहुना तसा प्रयत्न करणे हे अभिप्रेत असते. सहज शक्य नाही. प्रयत्नाने सत्यम वद धर्म चर हे घडवून आणावे लागते. जगात यच्ययावत, प्राणीमात्रात त्याच भगवंताचे दर्शन घेणे हा वैष्णवांचा धर्म असावा असे संतश्रेष्ठ तुकोबाराया आपल्याला सांगतात.

वासुदेव सर्वांमध्ये स:महात्मा स दुर्लभा हे गीता वचनाचे आहे. उपवास, व्रतवैकल्य करणे, देवपूजा करणे, नामस्मरण करणे, तीर्थयाग करणे एवढीच उपासना नाही. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी अशी महाराजांची व्याख्या आहे. काळा-गोरा, गरीब- श्रीमंत,उच्च- नीच, स्वकीय- परकीय, सुशिक्षित- अशिक्षित, जातीचा-परजातीचा, रोगी- निरोगी, माझा-तुझा, लहान- मोठा, सात्विक- तामस हा भेद मनी न बाळगता येकाच आत्म तत्त्वाला आवाहन करून चैतन्य रूपाने तो एकच आहे हा भाव ठेवून राहणे आणि भेदाभेदाच्या पलीकडे जायचं आहे. हा प्रवास दुरचा आहे. longest journey, but Journey within.

नभी वावरे जो अणू- रेणू काही
ही प्रचिती आपल्याला घ्यावयाची आहे .त्याच्या अनुषंगाने अभ्यास करावयाचा की काही करायचे ते योग्य दिशेने व योग्य मार्गदर्शनाखाली बनत बनत बन जाये हे चालणं विशिष्ट मार्गाने व्हावं. आडमार्ग यातही आहेत. अंधश्रद्धा, बुवाबाजी तीन दिवसात चमत्कार असं बनवाबनवीचं तंत्र इथे चालणार नाही. भागवत भक्ताने ही गोष्ट लक्षात असू द्यावी. संपूर्ण सृष्टीचा विचार हवा. मुक्या प्राण्यांवर दया केली पाहिजे. पक्षांना घर दिले पाहिजे. वृक्षांची जोपासना केली पाहिजे.पाणी म्हणजे जीवन ते स्वच्छ निर्मळ ठेवले पाहिजे. कोणी प्रदूषण करून आसमंत प्रदूषित करू नये. हे सर्वेश्वर पूजन आहे. याही पुढे जाऊन कोणाही जिवाचा मस्तर करू नये. घरापासून सुरुवात करावी मग शेजारी, मग कार्याचं कार्यक्षेत्र, आपला समाज असं करीत ही व्याप्ती वाढवीत जावे.

आपल्या हातून सत्कर्म व्हावीत म्हणून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, दासबोध हे ग्रंथ प्रमाण मानावेत. या ग्रंथातून भक्त कसे असावेत सद्गुरू कसे असावेत, त्यांची लक्षणे हे सर्व प्रतिपादित आहे. असे सद्गुरू लाभले तर त्यांना शरण गेले पाहिजे. त्यांचे चरण कधीच सोडता कामा नये कारण याने जो लाभ होणार आहे तो अलभ्य असा आहे.

ऐहिक व्यवहारात जे शुभ लाभ होतात ते सुख देतातच. चांगली नोकरी मिळणे,चांगले पती-पत्नी मिळणे, चांगले कन्या- पुत्र असणे, चांगली वास्तु, अवती भोवतीचा चांगला लोकसंग्रह हे अनुकूलता आपण भगवंताच्या जवळ जाण्यासाठी त्याचा साधन म्हणून वापर करावा. एकही दुष्ट गुण आपण आपल्याजवळ ठेवू नये.भक्त असाल तर चैतन्याचा वास सर्वकाळ तुमच्या ठायी असावा आणि सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे दुसऱ्याच्या सुखात सुख व दुसऱ्याच्या दुःखात दुःख वाटण्याची सवय आपल्याला सहज लावायला हवी. तशी माणसाची सहज प्रवृत्ती असते. पण एखादा रस्त्याने जाताना घसरून आपल्या देखत पडला तर आपणही आई.. ग असं नकळत म्हणतो. याला कारण आत्मतत्त्वाने आपण सारे एकच असतो.

वैष्णव जन तो तेणे कहीए I
जो पीड पराई जाने रेII

परदुःखाने परपिडीने केवळ वाईट वाटून भागणार नाही तर त्याची सेवा घडली पाहिजे.ही सेवा म्हणजे खरे सर्वेश्वर पुजन. जी अनेक देशभक्तांनी केली. समाजसेवकांनी केली व महाराष्ट्रभूमीत असंख्य संत महानतांची केली. सर्वसामान्यांना उमजेल, पटेल असे वाड्मय संतांनी लिहिले. त्यांचे अनंत उपकार आहेत. ते वाचायला वेळ नाही म्हणून न वाचणे म्हणजे फार मोठ्या ज्ञानाला आपण मुकतो आहोत हे लक्षात आलं पाहिजे.

असाच हा गाथेतील अतिशय प्रसिद्ध व लोकमान्य सर्वपरिचित असा अभंग आहे.

विष्णुमय जग I वैष्णवांचा धर्म II

अखिल विश्वाला सामावून घेणारा व आपल्या हृदयात अढळ स्थान होऊन राहणारा.

श्रीकृष्ण शरणम् मम्…..

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.