जळगाव पोलीस संघाला २० वर्षानंतर विजेतेपद

0

जळगाव ;– गेल्या ५ दिवसापासून सुरू असलेल्या नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद यंदा जळगाव संघाने पटकावले. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष दोन्ही गटात जळगाव संघाने हा बहुमान पटकावला. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव संघाला विजेतेपदाची ढाल प्रदान करण्यात आली.

३४ वी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. समारोपीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, प्रमुख अतिथी आ.किशोर पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर होते. प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, नंदुरबारचे पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील, नाशिक शहरचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, कृष्णांत पिंगळे, कुणाल सोनवणे, सुनील नंदवाळकर, राजकुमार शिंदे, धनंजय येरुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस गृह उपअधीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस वेलफेअर शाखेच्या रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, डॉ.विशाल जयस्वाल, महेश शर्मा, अनिल भवारी, लिलाधर कानडे, जयपाल हिरे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

सांघीक भावनने व जिंकण्याच्या उद्देशाने विजयी खेळाडू आगामी महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस क्रिडास्पर्धेमध्ये सहभागी होतील व विजयश्री खेचून आणतील असा मला विश्वास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. क्रिडास्पर्धेमुळे संघ भावना जोपासली जाते व सामंजस्य निर्माण होते. या स्पर्धेमुळे देखील परिक्षेत्रातील पोलीस खेळाची गुणवत्ता आपल्या पोलीस कर्तव्यात सकारात्मक योगदान देतील आणि परिक्षेत्रीय पोलीस दलाची प्रतिमा उंचावतील असा मला विश्वास पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांनी व्यक्त केला.

पाच दिवसात संपन्न झालेल्या परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये जळगाव, नाशिक, आयुक्त (शहर), नाशिक ग्रामीण, धुळे, अहमदनगर, नंदुरबार या विभागातील ६८० पुरुष व ११५ महीला खेळाडूंनी भाग घेतलेला होता. क्रिडा स्पर्धामध्ये सांघिक खेळात प्रथम विजेते पुरुष व महिला १५१ बक्षीस, उपविजेते १५१ बक्षीस वैयक्तीक खेळात खेळात पुरूष खेळाडू प्रथम ११० बक्षीस व व्दितीय ११० व तृतीय बक्षीस ११०, महिला वैयक्तीक खेळात प्रथम ८५ बक्षीस व व्दितीय ८५ व तृतीय ८५ बक्षीस असे एकुण ८८५ मेडल देण्यात आलेले आहे. सर्व स्पर्धा अतिशय अतितटीच्या झाल्या असून वैयक्तीक खेळामध्ये धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, वेटलिफ्टिंग, भाला फेक, कुस्ती ज्युडो, स्विमिंग, हॅमर थ्रो बॉक्सिंग इत्यादी वैयक्तीक व हॉकी, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, बास्केटबॉल, हॅन्डबॉल, खो-खो सारख्या सांधिक क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यासर्व स्पर्धांमध्ये सहा विभागातील खेळाडुंनी अतिशय उत्साहाने भाग घेतल्यामुळे या स्पर्धा अत्यंत चुरशच्या झाल्या. स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळ खेळल्यामुळे या स्पर्धा अत्यंत चांगल्या झाल्या आहेत.

मैदानी स्पर्धेत महिला गटातून कीर्ती भिसे यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून तर इस्राईल खाटीक यांना पुरुष गटातून उत्कृष्ट खेळाडू म्हणून दुचाकी भेट देऊन गौरविण्यात आले. सर्व स्पर्धेत १०० मीटर धावणे पुरुष इस्राईल खाटीक प्रथम, द्वितीय राहुल गोराडे दोघे जळगाव, महिला गटात जागृती काळे जळगाव, द्वितीय अश्विनी जाधव धुळे, सांघिक खेळ पुरुष गटात ॲथलेटिक्स प्रथम जळगाव, द्वितीय नाशिक शहर, फुटबॉल प्रथम जळगाव, द्वितीय नाशिक ग्रामीण, हॉकी जळगाव प्रथम, द्वितीय नाशिक शहर, कबड्डी प्रथम नाशिक शहर, द्वितीय जळगाव, खो-खो प्रथम अहमदनगर, द्वितीय जळगाव, बास्केटबॉल प्रथम नाशिक शहर, द्वितीय धुळे, हँडबॉल प्रथम नाशिक शहर, द्वितीय नंदुरबार, हॉलीबॉल प्रथम धुळे, द्वितीय नाशिक शहर, बॉक्सिंग प्रथम जळगाव, द्वितीय नाशिक ग्रामीण, कुस्ती प्रथम जळगाव, द्वितीय नाशिक ग्रामीण, जुडो प्रथम धुळे, द्वितीय नाशिक ग्रामीण, जलतरण प्रथम जळगाव, द्वितीय नाशिक शहर, वेटलिफ्टिंग प्रथम जळगाव, द्वितीय नाशिक शहर, क्रॉस कंट्री नाशिक शहर, द्वितीय जळगाव, सांघिक खेळ महिला कबड्डी प्रथम जळगाव, द्वितीय नाशिक ग्रामीण, खो-खो प्रथम, अहमदनगर द्वितीय, धुळे बास्केटबॉल प्रथम, जळगाव द्वितीय नाशिक शहर, हॉलीबॉल प्रथम नाशिक शहर, द्वितीय जळगाव, कुस्ती प्रथम नाशिक शहर, द्वितीय जळगाव, जुडो प्रथम नाशिक शहर, द्वितीय धुळे, वेटलिफ्टिंग नाशिक शहर प्रथम, द्वितीय जळगाव, बॉक्सिंग प्रथम जळगाव, द्वितीय अहमदनगर, क्रॉस कंट्री प्रथम जळगाव, द्वितीय नाशिक, सर्वसाधारण विजेतेपद पुरुष जळगाव, उपविजेता नाशिक शहर, सर्वसाधारण विजेतेपद महिला जळगाव, उपविजेता नाशिक शहर यांनी बाजी मारली.

Leave A Reply

Your email address will not be published.