राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी आंतर शालेय फुटबॉल स्पर्धाना उद्यापासून प्रारंभ

0

जळगाव ;- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा १४ व १७ वर्षाखालील मुले व मुली च्या स्पर्धेला गुरुवार १७ तारखेपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव या ठिकाणी होत असून या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा संघटनेचे तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांच्या हस्ते होत आहे.

१४ वर्षे मुले व १७ वर्षे मुले यांचे प्रत्येकी नऊ संघ तर १७ वर्षातील मुलींचे ८ संघ यांचा सहभाग निश्चित झाला असून या स्पर्धा बाद पद्धतीने खेळवल्या जाणार आहेत. या स्पर्धेतील ३ विजयी व ३ उपविजयी संघांना तसेच विजयी व अपविजयी संघातील प्रत्येक खेळाडूला सुवर्ण व रजत पदक तसेच प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला एक सुवर्ण पदक असे पारितोषिके जळगाव जिल्हा संघटने मार्फत जैन स्पोर्ट्स अकॅडमी, गोदावरी फाउंडेशन, पींच बॉटलिंग व स्पोर्ट्स हाऊस यांच्या माध्यमाने देण्यात येणार आहे.

किट व शूज चे वाटप

चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय खेळाडू कामे करीत असून बुधवारी त्यांना प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी कार्तिक चव्हाण यांच्या हस्ते शूज व किट वाटप करण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे सचिव फारूक शेख व जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांची उपस्थिती होती.

क्रीडाप्रेमी व शालेय विद्यार्थ्यांना आवाहन
१७ ते २० ऑगस्ट अशा ४दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी व क्रीडा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.