शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- आयुक्त चित्रा कुळकर्णी

0

पथराड येथे शेतकरी मेळावा उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

नागरिकांसाठी शासनाने सेवा सुरू केलेल्या आहेत. सेतु, आपले सरकार ईसेवा केंद्र येथे जाऊन शासनाच्या सेवा मिळवू शकतात. जास्तीतजास्त नागरीक, शेतकऱ्यांनी या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक विभाग सेवा हक्क आयुक्त चित्रा कुळकर्णी यांनी केेले. पथराड येथील प्रगतीशील शेतकरी श्रीकांत चव्हाण यांच्या शेतात जैन फार्म फ्रेश फूडस लिमिटेड आणि ‘कागोमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी चर्चासत्र आणि शिवार फेरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव संभाजी ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी जाधवराव, धरणगाव नायब तहसीलदार सातपुते, तालुका कृषी अधिकारी पी.जी. चव्हाण, करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा, जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे रोशन शहा, शास्त्र डॉ. बी.के. यादव, कागोमी कंपनीचे भारताचे प्रमुख मिलन चौधरी, जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी.एम.बऱ्हाटे, कागोमी सीडस् विभागाचे व्यवस्थापक व्यंकट पवार हे मान्यवर उपस्थित होते.

सेवा हक्क आयोग आयुक्त चित्रा कुळकर्णी यांनी शेतकऱ्यांना सेवा व हक्क याबाबत सविस्तर सांगितले. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यात २०१५ पासून लोकसेवा हक्क कायदा अंमलात आला आहे. शासनाच्या विविध विभागांकडून अधिसूचनित केलेल्या सेवा, ठराविक मुदतीत प्राप्त करून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. महाराष्ट्र शासनाच्या ५०६ सेवा त्या अंतर्गत येतात. सद्यस्थितीत ३८७ सेवा ऑनलाईन अर्ज करून मिळतात अशी माहिती त्यांनी शेतकऱ्यांना भाषणातून दिली.

आरंभी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुरवातीला शेतकर्‍यांनी टोमॅटो’ लावलेल्या शेताची पाहणी केली. त्यावेळी शेतकरी श्रीकांत चव्हाण, कृषीतज्ज्ञ विरेंद्रसिंग सोळंकी, श्रीराम पाटील, जैन इरिगेशन कंपनीचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे यांनी पीक व ठिबक सिंचन, तुषार सिंचन याबद्दल माहिती सांगितली.

कागोमी कंपनी भारताचे प्रमुख मिलन चौधरी यांनी कागोमी कंपनी आणि टोमॅटो व्हरायटी बाबत सविस्तर सांगितले. जैन इरिगेशन व कागोमी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या करार शेतीबद्दल मोलाची माहिती दिली. ज्यांच्या शेतात हा शेतकरी मेळावा झाला ते शेतकरी श्रीकांत चव्हाण यांनी आपल्या कंत्राट फार्मिंग आणि शेतीचे अनुभव सांगितले. माझ्या शेतात गत वर्षी टोमॅटो रोपे लावली होती मला खूप फायदा झाला म्हणून मी पुन्हा टोमॅटो लागवड केली, एका झाडाला 10 ते 12 किलो टोमॅटो लागतील. जैन इरिगेशनशी झालेल्या करारानुसार तो सगळा टोमॅटो जैन इरिगेशन हमी भावाने टोमॅटो खरेदी करतात. त्यामुळे मला शाश्वत उत्पन्न मिळणार हे आवर्जून सांगितले.

जैन इरिगेशन कंपनीचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे, कागोमीचे व्यंकट पवार, तलाठी कांचन वाणी यांनी देखील शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभारप्रदर्शन पांढरा कांदा करार शेती विभागाचे सहकारी श्रीराम पाटील यांनी केले. जळगाव, पाळधी, धरणगाव, एरंडोल, अमळनेर तालुक्यातील सहाशे हून अधिक शेतकरी या शेतकरी मेळाव्यास उपस्थित होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.