साधं राहूनही संस्कृती जपता येते : हेमलता बामनोदकर

0

 

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा

 

हल्ली नवीन ट्रेंड आला आहे. बऱ्याच गोष्टी बदललेल्या देखील दिसतात. मात्र आजही असं असं केलं म्हणजे आपल्याला देवी प्रसन्न होईल, अशी मानसिकता दिसून येते. मात्र असं काहीही नाही. शिक्षणाने फार मोठी जनजागृती केली आहे. आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनेक बदल झाले. आधुनिकता आली आहे. आपण अनेक सण उत्सव देखील मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतो. मात्र त्यासाठी प्रत्येक वेळी खर्च करणे गरजेचे नाही. साधं राहूनही सांस्कृतिकता जपता येते. तुमच्यामध्ये श्रद्धा भक्ती असणं फक्त गरजेचे आहे. त्यासाठी कुठल्याही देखाव्याची गरज नाही. एखाद्याकडे पैसे नाही म्हणजे त्याने संस्कृती जोपासू नये, सण साजरे करू नये, असं मुळीच नाही. उलट साधेपणातून अधिक चांगली संस्कृती जपता येईल, असे प्रतिपादन हेमलता बामनोदकर यांनी केले.

दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात नवरात्रोत्सवानिमित्त जागर संस्कृतीचा या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्या बोलत होत्या.

त्यापुढे म्हणाल्या, तुमच्यातील चांगुलपणाने खऱ्या अर्थाने देवी प्रसन्न होईल. त्यासाठी बडेजाव करण्याची गरज नाही. ज्याला काही मिळत नाही त्याला एखादी गोष्ट दान करा, हा तुमचा चांगुलपणा तुम्हाला आत्मिक मनशांती देईल आणि देवीला प्रसन्न करेल. परोपकाराने खऱ्या अर्थाने सण साजरे होतात. सणानिमित्त अशा गोष्टी सहज शक्य होतात.

आपल्याला हे सण उत्सव देखील याच दृष्टिकोनातून दिले आहेत. यानिमित्ताने अनेकांच्या भेटी होतात, आदर सत्कार केला जातो. बरेच नातेसंबंध जोपासले जातात. तसेच परंपरा देखील टिकवल्या जातात. यातूनच खऱ्या अर्थाने पारिवारिक संबंध आणि नाती टिकून राहतात. मात्र अलीकडे फ्लॅट सिस्टीम मुळे बंद दरवाजा प्रकार दिसून येतो. पूर्वी प्रत्येकाचं सोयरे सुतक विचारलं जायचं. मात्र फ्लॅट सिस्टीमने सर्वांचे दरवाजे बंद दिसतात. हे थोडं त्रासदायक आहे. यामुळे बंदिस्तपणा वाढला आहे. ओळखी कमी झाल्या, जाणिवा आणि देवाणघेवाण तर अत्यंत दुर्मिळ झाले आहेत.

आपली संस्कृती मात्र याउलट आहे. आपली संस्कृती दार उघडे ठेवून सण साजरे करायला सांगते. यातून आपण सर्वांना सामावून घेण्याचा संस्कार जपतो. आपली भारतीय संस्कृती खूप मोठी आणि विस्तीर्ण आहे. तिला टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. आपण कितीही आधुनिक झालो तरी संस्कृती टिकवून ही आपली जबाबदारी राहील. रूढी परंपरा जपणे, नमस्कार करणे, श्रद्धा जोपासणे या दृष्टीकोनातून आपण आपल्या परीने हे सण उत्सव साजरे केले पाहिजे. मात्र सण उत्सवांमध्ये कुठलाही बडेजाव न करता साधेपणातूनही हे सण आणि संस्कृती सहज जपता येतात. फक्त श्रद्धा असणं गरजेचं आहे, असे त्या म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.