खाकी वर्दी सशक्तिकरणासोबत संस्कारही शिकवते : मनीषा पाटील

0

लोकशाही जागर संस्कृतीचा

पोलीस खात्यामध्ये कार्यरत असताना सांस्कृतिकता जोपासण्यासाठी तसा वेळ कमी मिळतो. मात्र अंगावर असलेली खाकी वर्दी ही एक महिला म्हणून सशक्तीकरणासोबत संस्कार देखील शिकवत असते. या माध्यमातून आम्ही बऱ्याचदा विविध उपक्रमांचा नकळत भाग होतो. यातून एखाद्या ठिकाणी व्याख्यान देणे, स्वयंरक्षणाचे धडे देणे, सशक्तीकरणा संदर्भात मार्गदर्शन करणे, नव्याने भरती होणाऱ्या मुलींना मदत करणे, मार्गदर्शन करणे यामुळे आपोआप संस्कारांची रोपे रुजवत असतो. यातूनच खाकी वर्दीचा जास्त अभिमान वाटतो, असे प्रतिपादन अनैतिक मानवी वाहतूक विभागाच्या मनीषा पाटील यांनी लोकशाहीच्या कार्यालयात केले.

दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात नवरात्रीनिमित्त जागर संस्कृतीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संस्कृती संदर्भात समाजातील प्रतिष्ठित महिलांकडून विचार जाणून घेतले जात आहेत. काल दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महिला पोलीस मोनाली कळसकर, शहर वाहतूक पोलीस सविता परदेशी, अनैतिक मानवी वाहतूक विभागाच्या मनीषा पाटील, पोलीस पत्नी वैशाली गायकवाड, जागृती निकम आणि भाग्यश्री तायडे उपस्थित होत्या.

यावेळी मनीषा पाटील म्हणाल्या, आजकालच्या काळात मुलांना घडवणे त्यांच्यावर योग्य संस्कार पेरणे यासोबतच त्यांना संस्कृती समजावून सांगणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, गरजेचे आहे. या माध्यमातून आम्ही यावर्षी नवदुर्गा महिला मंडळ मंडळाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करत आहोत. हा यंदाचा पहिल्या वर्षीचा उपक्रम असला तरी, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामुळे महिलांची भीती काही प्रमाणात कमी करू शकतो. ही मुळात काळाची गरज आहे.

यावेळी बोलताना महिला पोलीस मोनाली कळसकर म्हणाल्या, धकाधकीच्या जीवनात पोलिसांचे जीवन अधिकच विस्कळीत होऊन जाते. मात्र याला परिवाराची साथ खूप मोलाचे ठरते. आम्ही सातत्याने खाकी वर्दीत राहतो. त्यामुळे उत्सवांचा अनुभव आम्हाला खाकीतच घ्यावा लागतो. मात्र खाकी वर्दी आम्हाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असते. एक स्त्री जे करू शकते ते इतर कुणीही करू शकत नाही. एरवी घरातलं काम करताना काम करण्याची जीवावर येते. मात्र एकदा का वर्दी परिधान केली की, कितीही थकलेले असले तरी एक प्रचंड ऊर्जा अंगात भिनते. मग कुठेही कोणतेही काम असो काही विशेष वाटत नाही. असे त्या म्हणाल्या.

कळसकर पुढे म्हणल्या, अलीकडच्या काळातील मुलींबाबतच्या समस्या पाहता एवढेच सांगू इच्छिते की, मुलींच्या आणि मुलांच्या वयात येण्याच्या काळात त्यांचा आपल्या परिवारावर विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी या वयात योग्य तो संवाद साधणे फार गरजेचे आहे. पहिला गुरु हे आई वडील असतात. त्यामुळे त्यांनी आपल्या पाल्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणि समज रुजली पाहिजे. तरुणांनीही आपल्या शिक्षणाचा योग्य फायदा करून घेणे, आपल्या करिअर कडे फोकस करणे गरजेचे आहे. जर तुम्ही स्वतःला समजून घेऊ शकत नसाल तर तुमच्या शिक्षणाचा काहीही फायदा होत नाही. यासोबत महिलांनीही महिलांना मदत करणे आजच्या काळात अत्यंत महत्वाची गरज म्हणता येईल.

यावेळी बोलताना शहर वाहतूक विभागाच्या सविता परदेशी म्हणाल्या, नोकरीमुळे सांस्कृतिक उपक्रमात सहभागी व्हायला वेळ कमी मिळतो. व्यस्त कामामुळे फार ओढाताण होते. मात्र संस्कृतीची ओळख होण्यासाठी महिलांना परिवाराची साथ मिळणे फार गरजेचे आहे. वास्तविक आमची खाकी हीच ओळख आहे. आम्हाला सिविल ड्रेसमध्ये बऱ्याचदा शेजारी राहणारेही ओळखत नाहीत. आमचा समाजाशी सातत्याने संपर्क येत असतो. या माध्यमातून त्यांना बऱ्याचदा देवीच्या विविध रूपातून नियम शिकवावे लागतात. मात्र हे मार्गदर्शन त्यांच्याच भल्यासाठी असते, हे नागरिकांनी विसरू नये.

यावेळी बोलताना वैशाली गायकवाड म्हणाल्या ग्रामीण आणि मागासलेल्या भागात प्रबोधन आणि शिक्षणाची गरज प्रचंड वाढली आहे. आम्ही आमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. हीच एक प्रकारे आम्ही सांस्कृतिकता जोपासतो. माझे पती सध्या उपनिरीक्षक पदाच्या ट्रेनिंगसाठी गेले आहेत. त्यामुळे ते आल्यावर आमची जबाबदारी अधिक वाढलेली असेल. एक पोलीस पत्नी म्हणून पतीला साथ देण्यासोबतच स्वतःच्या घरी देखील संस्कार रुजवताना समाधान मिळते. त्यासोबतच एक महिला म्हणून एवढेच सांगू इच्छिते की, महिला काय काय करू शकतील याची त्यांना जाण करून देणे महत्वाचे आहे. त्यामुळे महिलांनी खचून न जाता शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे त्या म्हणाले.

यावेळी जागृती निकम यांनी सांगितले की, संस्कृती टिकवायची असेल तर महिलांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भाग अद्यापही शिक्षणापासून वंचित आहे. शहरांमध्ये शिक्षण बऱ्यापैकी रुचलेले दिसून येते. मात्र ग्रामीण भागात महिलांना सशक्त करणे अधिक गरजेचे ठरते. एक पोलीस पत्नी म्हणून संपर्कात येणाऱ्या प्रत्येक महिलांना प्रोत्साहित करणे, हे देखील आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मदत करताना एक समाधान मिळते. काही स्त्रिया फक्त सहन करतात. ते त्यांनी मुळीच करू नये. आम्हाला वर्दीचा अभिमान आहे. कारण या माध्यमातूनच आम्ही विचारांची देवाण-घेवाण अधिक सशक्तपणे करू शकतो. मधल्या काळात पोलिसांच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोनही समाजाचा वेगळा होता. मात्र पोलिसांच्या मुलांनी आता मोठमोठ्या पदांवर कार्यरत होऊन समाजाचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे देखील गरजेचे आहे. यामुळे पोलिसांचा सन्मान व्हावा, पोलिसांना साथ द्यावी एवढेच अपेक्षित आहे. पोलीस हे समाजासाठीच असतात. त्यामुळे सण उत्सव जर शांततेत झाले, तर कुठलाही अनुचित प्रकार न घडता पोलिसांचे समाजाला नक्कीच सहकार्य मिळते.

यावेळी बोलताना पोलीस पत्नी भाग्यश्री तायडे म्हणाल्या, उत्सवा मागचा उद्देश समजून घेणे गरजेचे आहे. हे विचार लोकांपर्यंत जाण्यासाठी सुरुवात जरी पुरुषांनी केली असली तरी, आता स्त्रियांनी पुढाकार घेऊन यामध्ये अधिक काम करणे काळाची गरज म्हणता येईल. आम्ही सुरू केलेल्या नवदुर्गा महिला मंडळातून याला या वर्षीपासून सुरुवात केली आहे. त्यामुळे मानसिकता बदलायला आम्ही कुठेतरी कामात पडतो याचे समाधान आहे. महिलांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील. कारण हल्लीची पिढी सोशल मीडिया, मोबाईल मध्ये अडकलेली असून त्यांच्यामध्ये संस्कार रुजवणे, त्यांच्या गुणांना वाव देणे, क्रीडा क्षेत्रात त्यांना निपुण करणे शक्य करायचे असेल तर त्यांच्या संपर्कात राहून त्यांना मार्गदर्शन करावे लागेल. कारण आपल्या संस्कृतीचा जागर आपणच करू शकतो. आपल्या गरजा मर्यादित असतात मात्र अधिक गरजा निभावण्याच्या नादात मुलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना योग्य संस्कार देणे ही देखील आई-वडिलांचीच जबाबदारी आहे.

शब्दांकन – राहुल पवार

Leave A Reply

Your email address will not be published.