इस्रायलकडून गाझापट्टीची संपूर्ण नाकाबंदी

0

जेरुसलेम : इस्रायलमध्ये रक्तपात घडवल्यानंतर कुख्यात हमासची सैन्य व शासन क्षमता नष्ट करण्यासाठी इस्त्रायलने गाझापट्टीची संपूर्ण नाकाबंदी करण्याची सोमवारी घोषणा केली आहे. येथील वीज, अन्नधान्य व इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखण्याचे पाऊल उचलत इस्रायलने हमासची चौफेर कोंडी केली आहे. याचवेळी सीमेवर तब्बल १ लाख सैनिक व रणगाडे तैनात केले आहेत. याशिवाय ३ लाख राखीव सैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश इस्त्रायल सरकारने दिले आहेत. त्यामुळे इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. या संघर्षात चोवीस तासांत आणखी ५०० जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या १३०० हून अधिक झाली आहे.

इस्रायलमधील राजकीय अस्थिरतेचा गैरफायदा घेत हमासने गेल्या शनिवारी भीषण रॉकेट हल्ले केले. त्यामुळे इस्रायल व हमास यांच्यात गाझापट्टीत युद्धाची ठिणगी पडली आहे. आता इस्त्रायलने हमास विरोधात कठोर पवित्रा घेत गाझावरील हल्ले तीव्र केले आहेत. येथील अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी १ लाख सैन्य घुसवले आहे. सीमेवर रणगाडे तैनात केले आहेत. याशिवाय ३ लाख राखीव सैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश इस्रायलचे संरक्षणमंत्री

योव गॅलेंट यांनी दिले आहेत. गाझापट्टीतील वीज, अन्नधान्य व इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखण्याचे फर्मान त्यांनी सोडले आहे. सीमेवरून दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी इस्रायलचे जवान कडक पहारा देत आहेत. पण याचवेळी हमासने सुद्धा गाझापट्टीच्या बाहेर लढा सुरू ठेवला आहे. इस्रायलच्या तावडीतून पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यासाठी तयार असल्याचे हमासचा प्रवक्ता अल-कनौआने म्हटले आहे. विशेष बाब अशी की, हल्ल्यानंतर हमासचे समूळ उच्चाटन करण्यासाठी इस्रायलने युद्धाची औपचारिक घोषणा केली. अतिरेक्यांवर सूड उगवण्यासाठी सैन्य आक्रमण सुरू केले.

या लढ्यात अमेरिकेसह अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. हमासविरोधात लढण्यासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही या देशांनी दिली आहे. याचवेळी हमासच्या दहशतवाद्यांनीही इस्रायलवर रॉकेटचा मारा सुरूच ठेवला आहे. म्हणून राजधानी जेरुसलेम व तेल अवीव आणि इतर शहरांमध्ये हवाई हल्ल्याचा अलर्ट सांगणारा सायरन वाजत आहे. दुसरीकडे, इस्त्रायल व हमास यांच्यातील ताज्या संघर्षातील मृतांची संख्या १,३०० झाली आहे. तसेच हजारो जण जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.