युवकांचे मानसशास्त्र… प्रेरणा…

0

लोकशाही विशेष लेख

प्रेरणा (inspiration) ही मानसशास्त्रातील अमूर्त अशी संकल्पना आहे. मुळातूनच एखाद्या जीवाला जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते, म्हणूनच तो जीव या भूतलावर कुणाच्या तरी माध्यमातून जन्माला येतो. ‘जी शक्ती व्यक्तीला कार्य प्रवृत्त करते आणि कार्य पूर्ण होईपर्यंत टिकून राहते, त्या शक्तीला प्रेरणा असे म्हणतात. ’ प्रेरणा ही आंतरिक आत्म्याची दैवी देन आहे. प्रेरणा ही आंतरिक चालना देणारी शक्ती आहे. प्रेरणेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेरणेमुळे व्यक्ती अथवा प्राणी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात. प्रेरणा ही सतत अखंडपणे व्यक्तीला प्रेरित करत असते. प्रेरणेवर अनेक घटकांचा म्हणजे जैविक, मानसिक, सामाजिक प्रभाव असतो. प्रेरणेमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक ऊर्जा प्राप्त होते. प्रेरणा ही सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. प्रेरणेमुळे आपल्या क्षमतेचे रूपांतर कार्यनिष्पादनात होते, कामाची गुणवत्ता सुधारते.

दैनंदिन जीवनात कुठल्याही सजीव घटकांच्या बाबतीत प्रेरणाही चक्राकार स्वरूपात असणारी अखंडितपणे चालणारी आंतरिक शक्ती आहे. त्यात व्यक्तीला गरजेनुसार ती गरज पूर्ण करण्यासाठी त्यांच्यात ताण निर्माण झाल्यावर त्या दिशेने गरज पूर्ण झाल्यावर व्यक्तीला समाधान प्राप्त होते. मात्र या ठिकाणी त्याच्या सर्व गरजांची पूर्तता झाली आहे, असे आपणास म्हणता येत नाही. त्यातून अनेक दुसऱ्या गरजा त्या व्यक्तीत निर्माण होतात. आणि प्रेरणा चक्र हे अखंडितपणे चक्राकार पद्धतीने तसेच सुरू असते.

अब्राहम मेसलो(Abraham Meslow) यांनी १९४३ मध्ये एका शोध निबंध नुसार मानवी प्रेरणेचा सिद्धांत सांगितला आहे. त्यानुसार त्याने व्यक्तीची सर्वात प्रथम शारीरिक गरजा किंवा प्रेरणा या पूर्ण करतात त्यात अन्न, पाणी, विश्रांती, लैंगिक प्रेरणा, यांचा समावेश होतो. त्यानंतर व्यक्तीला सुरक्षिततेबाबतच्या गरजा या पूर्ण कराव्या लागतात. निवारा आणि सुरक्षितता ही महत्त्वाची असते. पहिल्या दोन गरजा पूर्ण झाल्यावर व्यक्तीला आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, मान, सन्मान, आदर या सर्व गोष्टींची पूर्तता होणे गरजेचे असते. त्यानंतरची पायरी आहे ती म्हणजे आत्मप्रतिष्ठा. यात व्यक्तीला पहिल्या स्तरातील तीन स्तरांवरील गरजा पूर्ण झाल्यावर व्यक्तीची एक स्व प्रतिमा स्वतःबद्दलचा आदरभाव निर्माण होऊन त्याला आत्मप्रतिष्ठा प्राप्त होते. त्यात या व्यक्तीच्या सूचनेंचे पालन हे इतर व्यक्तींनी केले पाहिजे असे वाटते. या संपूर्ण गर्जा पूर्ण झाल्यावर आत्मवास्तविकीकरणाची किंवा आत्मप्रकटीकरणाची एक उच्चस्तरीय अवस्था ही व्यक्तीच्या जीवनात येते. या अवस्थेमधूनच चांगल्या देशभक्तांची, नेत्यांची, लेखकांची, विचारवंतांची, वैज्ञानिकांची, कलाकारांची योद्धांची निर्मिती होते.

मेसलोने जरी अशा पद्धतीने प्रेरणा वर्चस्व श्रेणी सांगितली असली, तरी भारतामध्ये अनेक साधू, संत, महंत याला अपवाद आहे. कित्येक वर्ष बिगर अन्नपाण्याचे या व्यक्ती तपस्येत लीन होऊन स्व-आत्म प्रकटीकरण करतात. नवीन ज्ञानाची, तत्त्वज्ञानाची निर्मिती करून त्या समाजाला स्वतः स्व प्रकाशित बनवून समाजाला प्रकाशमान बनवून टाकतात. गौतम बुद्धांनी कितीतरी वर्ष बोधी म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली तपस्या ध्यान, धारणा करून जगाला दिशा देणाऱ्या तत्त्वज्ञानाची निर्मिती केली. संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत रोहिदास महाराज, शालेय अल्पशिक्षित असताना देखील समाज गुरू आणि चिरंतकाल मार्गदर्शक म्हणून ठरले आहे. या व्यक्ती प्रतिभा संपन्न होत्या. त्यांच्या प्रेरणेमध्ये जग आणि समाज कल्याण करून देणे हा प्रबळ घटक होता.

या सर्व महान व्यक्ती मनुष्य म्हणूनच जन्माला आल्यानंतर त्यांनी जगत कल्याणाच्या समाज सुधारणेच्या प्रेरणे मधून त्यांना पुढे संतत्व, महान व्यक्ती, म्हणून प्रतिभा संपन्न व्यक्ती म्हणून समाजात स्थान प्राप्त झाले. त्या मागे त्यांची प्रेरणा हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य व्यक्ती आणि महान विभूती यांच्यामध्ये प्रामुख्याने ते बाळगत असणारी प्रेरणा आशा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, त्यांची विचार करण्याची पद्धत याच ठिकाणी मूलभूत फरक हा पडतो. व्यक्तींची प्रेरणा जितकी जगात कल्याणाची तितकी ती व्यक्ती मोठी महान विभूती व्यक्ती बनल्याचे दिसते. कारण नैसर्गिक क्रिया शक्ती देखील कालांतराने या व्यक्तींना सोबत करायला लागतात त्यांची मदत करतात. निकृष्ट दर्जाच्या प्रेरणा या निकृष्ट व्यक्तिमत्व दर्शवतात हे सूत्रच आहे.

सर्वसामान्य व्यक्तींच्या प्रेरणा प्राप्तित अडथळे निर्माण होत राहिल्यास या व्यक्ती चिंता तुर होतात. आत्महत्यांसारखे पर्याय निवडून स्वतःची सुटका करतात. तर असामान्य व्यक्ती त्यांच्या चिकाटीने सामना करतात त्यावर पर्याय शोधत आलेल्या अडथळांवर मात करतात. या त्यांची निसर्गतः क्रिया मानसिक आणि इतर सर्व प्रकारच्या शक्तीं या निश्चितपणे वाढलेल्या असतात.

युवा मित्रांनो आपण नेहमी स्वयं प्रेरित असणे केव्हाही ही बाब आपल्या यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी फार गरजेची आणि महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रेरणादायी विचार सतत ऐकणे, प्रेरणादायी आत्म चरित्रांचे सतत वाचन करणे, आपल्या प्रेरणा, आपल्या इच्छा, आपल्या महत्त्वाकांक्षा यांबाबतच्या स्वयं सूचना या सतत स्वतःला देणे, सदरच्या प्रेरणांचे इच्छांचे दररोज लिखाण करणे, आपल्या प्रेरणा ज्या काही आहे त्याबाबत सतत जागृत राहून त्याबाबतची माहिती संकलित करणे, तिचे विश्लेषण वर्गवारी करणे, त्या पूर्ण करण्यासाठी त्या क्षेत्रातील व्यक्तींच्या सतत संपर्कात राहणे त्यांच्याशी सतत संवाद साधने, गरजेचे आहे.

स्पर्धा परीक्षेमध्ये प्रामुख्याने इतकी टोकाची जीव घेणे स्पर्धा असताना देखील ग्रामीण भागातील मुलं आणि मुली जास्त संख्येने यु. पी. एस. सी. (U. P. S. C), एम. पी. एस. सी. (M. P. S. C) च्या परीक्षा या पास होताना दिसतात त्या ठिकाणी त्यांचा नोकरी मिळवणे बाबतची प्रेरणा हा घटक सोबतच इच्छाशक्ती ही प्रबळ असते. त्याला निरंतर प्रयत्नांची जोड असते.

प्रेरणादायी चित्रपट आपल्या क्षेत्राशी संबंधित बघणे देशभक्तीपर चित्रपटांमध्ये अनेक नावे सांगता येतील. त्यात सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट हा तिरंगा आहे. प्रेरणा घटक हा स्थल, काल, व्यक्ती, परत्वे बदलत जाणारा आहे. स्वतंत्र पूर्व काळात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांनी तारुण्यात निडरपणे हसत हसत फाशीवर जाण्याचा पर्याय स्वीकारला पण भारताला स्वातंत्र्य मात्र मिळवून देण्याची त्यांची आंतरिक प्रेरणा ही पूर्ण केली.

भारतामध्ये 90% युवक असे आहेत की, त्यांना त्यांच्या जन्माला येण्यामागचा उद्देशच माहित नाही. जापान मध्ये मात्र प्रत्येक युवकाला जीवन जगण्याचा एक निश्चित उद्देश एक निश्चित प्रेरणा आहे त्याला जापनीज लोक ईकीकाय म्हणून संबोधतात. ईकीकाय म्हणजे जीवन जगण्याचा उद्देश होय.

जगाच्या प्रेरणेचा मुख्य स्त्रोत हा सूर्य आहे. तोच सर्वांना रात्री झोपतो सकाळी उठवतो आपली ऊर्जा सजीवांमध्ये संक्रमित करून त्यांना वेगवेगळे कार्य कामे करण्यासाठी प्रेरित करतो ऊर्जा शक्ती प्रदान करतो. प्रेरणा शक्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वैयक्तिक भिन्नता या मात्र असतात.

 

प्रा. डॉ. आशिष जाधव/बडगुजर
पंकजकला वरिष्ठ महाविद्यालय, चोपडा.
हॅपी मिरर रीसर्च अँड मल्टीपर्पज फाउंडेशन, जळगाव.
९३७३६८१३७६

Leave A Reply

Your email address will not be published.