रतन टाटांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आलेल्या फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं रतन टाटा यांचं नाव घेऊन धमकी दिली. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा, अन्यथा ते सायरस मिस्त्री होतील, असं फोन करणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं. फोन आल्यानंतर पोलीस कंट्रोल रूममध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रं वेगानं फिरवली आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोध घेतला. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या, त्याच्या चौकशीत सदर व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कॉलरचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीनं आणि टेलिकॉम कंपनीच्या मदतीनं कॉलरचा शोध घेतला असता, त्याचं लोकेशन कर्नाटक असल्याचं समजलं. त्यानंतर धमकी देणाऱ्याचा पत्ता शोधला असता फोन करणारा पुण्याचा रहिवासी असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ पुण्यातील घरी धडक दिली. त्यावेळी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. धमकीचा फोन करणारी व्यक्ती गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असल्याची बाब समोर आली. सदर व्यक्तीच्या पत्नीनं यासंदर्भातील तक्रार पोलिसांत केल्याचंही समोर आलं.

चौकशीदरम्यान, कॉलरला स्किझोफ्रेनियाचा त्रास होता आणि त्यानं कोणालाही न सांगता घरून फोन घेतला आणि त्याच फोनवरून त्यानं मुंबई पोलिसांच्या कंट्रोल नंबरवर फोन केला आणि रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक आजारी आहे, त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. सदर व्यक्तीने फायनान्समध्ये एमबीए केलं असून अभियांत्रिकीचंही शिक्षण घेतलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.