गड्यांनो! किती खिरापती वाटणार?

0

 

मन की बात

दीपक कुलकर्णी 

 

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने वेगवेगळ्या योजना अंमलात आणून मदतीचा हात दिला खरा मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने काँग्रेस सरकार आरोपीच्या पिंजऱ्या उभे राहिले. हल्लीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करतांना खिरापत, रेवडी वाटपावरुन जोरदार हल्ला केला होता, मात्र तेच मोदी आता रेवड्या आणि खिरापत वाटपाचे कटोरे घेवून हिंडत आहेत. सत्तेसाठी वाट्टेल ते करणे हे सत्ताधाऱ्यांचे आणि राजकारण्यांचे कामच झालेले आहे. देशात आणि राज्यात प्रचंड समस्या असतांना त्या सोडविण्याकडे कुणाचेही लक्ष नाही हे तितकेच सत्य आहे. गेल्या पाच वर्षात तर महाराष्ट्रातील जनतेने सत्तेची जी संगीत खुर्ची अनुभवली तरी अतिशय घातक आहे. आपण मतदान कुणाला केले आणि सत्तेत कोण बसले हेच कळले नाही.

 

आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सत्ताधारी भाजपाने खिरापतीचे भांडे घेवून ती वाटपास सुरुवात केली आहे. परवाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ नावाची एक योजना घोषित केली आणि तिचा जीआर देखील हाताहात काढला देखील. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकार दरमहिन्याला पंधराशे रुपये देणार आहे. वरवार ही योजना सुखावह वाटत असली तरी ती राज्याच्या तिजोरीसाठी घातक आहे. सरकारसोबत काही अर्थतज्ज्ञ काम करीत असतात, त्या अर्थतज्ज्ञांच्या मते ही योजना कर्जाचा बोझा वाढविणारी आहे असे असतांनाही सरकारने विधीमंडळावर तुळशीपत्र ठेवून या योजनेचे बारशे घातले आहे. देश महासत्तेचे स्वप्न पाहत असतांना लोकांना अशा स्वरुपाची लालूच दाखविणे कितपत योग्य होणार आहे. मोफत धान्य, मोफत सिलिंडर, मोफत बस प्रवास आणि आता वरुन खर्चासाठी रोख पैसा हे कितपत योग्य आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मजूर मिळणे अवघड होवून बसले आहे. अशा योजनांमुळे शेतात काम करण्यास कुणी धजावत नाही. तर दुसरीकडे बेरोजगारीचा भस्मासूर मानगुटीवर बसून आहे. बेरोजगारी, सिंचन, वीज, शेती यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असतांना त्या सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न होतांना दिसत नाही.

ग्रामीण भागातील पायाभूत समस्या सोडविण्यासाठी सरकारने कुठलीही योजना हाती घेतलेली नाही. रस्ते, वीज, पिण्याचे पाणी यांच्या समस्या आजही आ वासून आहेत. शेतीला 12 तास वीज मिळत नाही, हमीभाव नाही त्यावर अर्थसंकल्पात छदामही मिळाला नाही. ‘बळीराज’ अशी उपाधी लावून असलेल्या शेतकऱ्याचा ‘बळी’ जात असतांना देखील सर्वच लोकप्रतिनिधी मात्र मांडीला मांडी लावून ‘आपुल्या हिता असे जो जागता’ या भुमिकेत आहे. सर्वच योजना वार्इट आहेत असे मुळीच नाही मात्र काही योजना या नागरिकांना कामापासून दूर पिळवित आहेत हे मात्र निश्चित! काँग्रेसवर टीका करतांना भाजपाने सर्व पातळ्या ओलांडल्या होत्या तोच भाजप आज काँग्रेसच्या पाऊलावर पाऊल ठेवून कार्य करीत असल्याने ‘आपले ठेवायचे झाकुण अन्‌ दुसऱ्याचे पाहयचे वाकून’ अशी स्थिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.