क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हॉकी सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताने हा सामना 10-2 ने जिंकला. या सामन्यातील विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक गोल केले. या सामन्यात त्याने एकूण 4 गोल केले आहेत.
कसा झाला सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या या पुरुष हॉकी सामन्यात भारतीय संघ पहिल्या क्वार्टरपासूनच पाकिस्तानवर वर्चस्व गाजवेल असे वाटत होते. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये 2 गोल केले. यादरम्यान मनदीप सिंगने 8व्या मिनिटाला आणि हरमनप्रीत सिंगने 11व्या मिनिटाला गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने दोन गोल केले. यादरम्यान कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि सुमितने प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या अर्ध्या वेळेपर्यंत टीम इंडिया 4-0 ने पुढे होती.
हाफ टाईमनंतर भारतीय संघाने आपली आघाडी आणखी मजबूत केली आणि या सामन्यात पाकिस्तानला पुढे येण्याची एकही संधी दिली नाही. हरमनप्रीत सिंगने सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये आणखी एक गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. हरमनप्रीत सिंगनेही भारतासाठी सहावा गोल केला. पाकिस्तानने तिसऱ्या क्वार्टरमध्ये पहिला गोल नोंदवला आणि सामन्यात पुनरागमन करण्याचा विचार केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये आणखी एक गोल नोंदवत 7-1 अशी आघाडी घेतली. यावेळी वरुण कुमारने गोल केला. पाकिस्तानचा दुसरा गोल चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये झाला, पण भारताने पुन्हा प्रत्युत्तर देत आपला 8वा गोल केला. या गोल नंतर भारताने इतिहासही रचला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने यापूर्वी कधीही 8 गोल केले नव्हते. सरतेशेवटी ललित आणि वरुणने प्रत्येकी एक गोल करत या सामन्यात भारताला 10-2 अशी आघाडी मिळवून दिली आणि भारताने ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.