उच्च रक्तदाब : कारणे, लक्षणे आणि उपाययोजना

0

लोकारोग्य विशेष 

उच्च रक्तदाब हा सध्या प्रत्येक घरात दिसणारा आजार झाला आहे. बऱ्याच वेळा हा आजार दुर्लक्षित रहातो किंवा दुर्लक्ष केले जाते. परंतु हा अत्यंत घातक आजार आहे. हा एक छुपा मारेकरी आहे. जगभरातील १. १३ अब्ज लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत.

ज्यावेळी हृदयाकडून शरीराला रक्त पुरवठा होतो तेव्हा हृदय आकुंचन पावते व हृदयाकडून महारोहिणीद्वारे संपूर्ण शरीरभर रक्त पुरवले जाते. त्याला रक्तदाब systolic बीपी म्हणतात व ते रक्त जेव्हा हृदयाकडे परत येते त्याला diastolic बीपी म्हणतात. साधारणपणे तरूण वयात 20 ते 30 वयोगटात 120/80 एमएम ऑफ एचजी हे नाॅर्मल असते. तर वाढत्या वयात 140/90 एमएम ऑफ एचजी हे सुद्धा नाॅर्मल मानले जाते.

आयुर्वेदानुसार वात व पित्त दोषांचे असंतुलन झाल्यावर रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे रक्त वाहिन्यांचा दाब सतत वाढतो ज्यामुळे हृदयावरील या वाढीव दाबामुळे शरीराच्या विविध अवयवांना हानी पोहोचते. हृदय, किडनी, मेंदू इत्यादी अवयवांवर घातक परिणाम होतो.

रक्तदाब वाढण्याची कारणे

चुकीची जीवनशैली 

1 अयोग्य व अनियमित आहार : तळलेले, चमचमीत, अती मीठाचे पदार्थ जसे लोणचे, पापड, साॅस, चीझ, बटर, अजीनोमोटो इ.

2 जेवणाच्या वेळा न पाळणे.

3 व्यायामाचा अभाव

4 मानसिक ताणतणाव

5 अनुवांशिकता

6 लठ्ठपणा

7 धूम्रपान, मद्यपान, तंबाखू इ.

काही लोक डाॅक्टरांकडे तपासणीसाठी जायचे म्हणून आधीच घाबरतात त्यामुळे त्यांचे बीपी जास्त येवू शकते म्हणून त्यांचे बीपी देखरेखीत ठेवावे लागते. बीपी जास्त आल्यास घाबरून जावू नये आणि दुर्लक्ष ही करू नये (स्वतःचे निदान तर अजिबात करू नये जसे. मी चालून आलो, मला टेन्शन आहे इ.)

लक्षणे

1 डोके दुखणे, गरगरणे

2 अचानक घाम येणे

3 पायांवर सूज येणे

4 धाप लागणे, धडधडणे

5 सतत उच्च रक्तदाब राहिल्याने

6 अर्धांगवायू

7 हृदयाचे विकार

8 मूत्रपिंडाचे विकार

9 डोळ्याच्या पडद्याचे विकार इ. होवु शकते

उपाययोजना

योग्य आहार: वरण, भात, भाकरी/ चपाती, विविध प्रकारच्या भाज्या, कडधान्ये, सलाड, सिझनल फळे इ.

रात्रीचे जेवण लवकर म्हणजे सुर्यास्ताला व हलके असावे.

रोज पोट व्यवस्थित साफ व्हावे

वजन नियंत्रीत ठेवावे

योग्य व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, दीर्घ श्वसन, ओंकार साधना, ध्यान इ. नियमित करावे

पुरेशी झोप

धूम्रपान मद्यपान बंद करावे

वादविवाद प्रसंगी स्वतःला शांत ठेवावे दीर्घ श्वसन करावे.

आयुर्वेदीय उपचार 

रक्तदाब वाढण्याचे कारण शोधून वैद्य त्यावर योग्य ते औषधे देतात.

शारीरिक व मानसिक दोन्हीसाठी औषधे दिली जातात. यामध्ये विशेषतः अश्वगंधा, आवळा, पुनर्नवा, सर्पगंधा, तुळस, अर्जुन इ. औषधी वनस्पतींचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा.

पंचकर्म 

वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण इ ने शरीरशुद्धी केली जाते. तसेच मानसिक रिलॅक्सेशन साठी शिरोधारा इ उपाय केले जातात.

आनंदी रहा निरोगी रहा.

योग्य जीवनशैली हीच आरोग्याची गुरूकिल्ली आहे.

आयुर्वेदीय दिनचर्या, ॠतूचर्या इ. अत्यंत उपयुक्त आहे.

 

डॉ. लीना बोरुडे

आयुर्वेदाचार्य, पुणे

मो. 9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.