धावत्या रेल्वेत हद्यविकाराच्या झटक्याने गोवंडी येथील इसमाचा मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

गोवंडी पुर्व (मुंबई) येथील ४८ वर्षीय इसम आपल्या परिवारासह रेल्वेतून प्रवास करीत असतांना धावत्या प्रवाशी रेल्वेत हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने व्यक्तीचा धावत्या रेल्वेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परिवारास माहिती मिळताच लखनौहुन मुंबईच्या दिशेने जाणारी सितापुर एक्स्प्रेस पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले. पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रुग्णवाहिका चालक बबलु मराठे, अमोल पाटील यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान शेख (वय ४८) रा. गोवंडी पुर्व (मुंबई) हे आई, पत्नी दोन लहान मुले व भाऊ यांचेसह लखनौ येथे कार्यक्रमानिमित्त गेले होते. कार्यक्रम आटोपून इम्रान शेख हे परिवारासह ८ फेब्रुवारी रोजी रात्री सितापुर सुपरफास्ट एक्स्प्रेस (क्रं. १२१०८) ने मुंबई येथे जाण्यासाठी निघाले. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास सितापुर एक्स्प्रेस भोपाल स्टेशनवर आल्यानंतर इम्रान शेख हे टाॅयलेटला गेले. मात्र खुप वेळ होवुन ही इम्रान शेख हे परत न आल्याने परिवाराने शोध घेतला असता, इम्रान शेख हे टाॅयलेटमध्ये पडलेल्या अवस्थेत आढळुन आले.

परिवाराच्या मदतीने इम्रान शेख यांना रेल्वेतील बी – १ डब्यातील बर्थवर आणुन त्यांना औषधोपचार करण्यात आले‌. त्यानंतर इम्रान शेख हे झोपले असल्याचे परिवारास वाटले. मात्र सितापुर एक्स्प्रेस जळगांव ते पाचोरा रेल्वेस्थानका दरम्यान इम्रान शेख यांना उठविण्याचा प्रयत्न केला. कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने परिवाराने रेल्वेत एकच आक्रोश केला. यानंतर तात्काळ पाचोरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक यांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान दुपारी ३ वाजुन ५२ मिनिटांनी सितापुर एक्स्प्रेस पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. सदरची माहिती पाचोरा लोहमार्गल पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार यांना मिळताच रुग्णवाहिका चालक बबलु मराठे, अमोल पाटील यांच्यासह पाचोरा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन गाठत सितापुर एक्स्प्रेस मधील बी – १ डब्ब्यातुन इम्रान शेख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मधुसूदन भावसार यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सुमारे ५ मिनिटांनी सितापुर एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली. रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व बबलु मराठे यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार हे करीत आहे. मयत इम्रान शेख यांच्या पाश्चात्य आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, चार भाऊ असा परिवार असुन इम्रान शेख हे घरातील कर्ते व्यक्ती असुन रिक्षा चालवुन आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.