चोपड्यात गो तस्करांचा पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

0

हल्ला करणाऱ्या ७ जणांना अटक ; इतरांचा शोध सुरु

चोपडा ;- : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. त्याचा राग मनात ठेवत १० ते १५ जणांनी कर्तव्यावर असलेले सपोनि अजित सावळे, पो.हे.कॉ. संतोष पारधी यांना मारहाण करत प्राणघातक हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शहरातील जुना यावल रोडवरील पालिकेच्या कत्तलखान्याजवळ घडली.

चोपड्यात गोवंशाच्या अवैध वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी वाढली आहे. आज तर त्यांची थेट पोलिसांवर हात टाकण्यापर्यंत मजल गेल्याने प्रशासनाला ही घटनेने विचार करायला भाग पाडले आहे. याप्रकरणी ७ जणांना पोलिसांनी अटक केली असून सावळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी १ रोजी कारवाई केली होती. या कारवाईचा राग मनात ठेवत साने गुरुजी वसाहतमधील सलीम कुरेशी यांच्यासह त्याची मुले व २०० ते ३०० लोकांचा जमाव शहर पोलीस ठाण्यावर आला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना तेथून हटकल्यानंतर त्यांनी यावल रोडवरील नगरपालिकेच्या कत्तलखान्याजवळ जमाव जमवला. त्यानंतर पेट्रोलिंगला जात असलेले सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे, पो.कारवाई का केली, अशी जमावाने विचारणा केली.

या वेळी जमलेल्या जमावाने अजित साबळे व संतोष पारधी यांना लोखंडी फायटर व लाकडी दांड्याने मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या वेळी जमावाने गलिच्छ शिवीगाळ करत मोठ्या आवाजात घोषणा देत हुज्जत घातली. या हल्ल्यात अजित सावळे जखमी झाले आहेत. तर पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी अजित सावळे यांच्या फिर्यादीवरून शेख साजिद शेख सलीम कुरेशी, शेख सऊद शेख सलीम कुरेशी (वय २४), शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी (५७), जियाउद्दीन गया सुदिन काझी (४३), शेख इब्राहिम शेख हमीद कुरेशी (५०), शेख नाझीम शेख युनुस (४२), शोएब सलीम कुरेशी, रईस रज्जाक कुरेशी, शेख मंजूर शेख मकसूद (२४), मझहर सैय्यद जहांगीर (वय २४, सर्व रा. साने गुरुजी वसाहत, चोपडा) व इतर १० ते १५ जणांवर कलम ३०७, ३५३ अन्वये चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यापैकी ७ जणांना रात्रीच पोलिसांनी अटक केली असून फरार असलेल्या इतरांचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष तांबे करत आहे.

सपोनि अजित सावळे पोलीस ठाण्याजवळ जमलेला २०० ते ३०० जणांच्या जमावाला पांगवत कत्तल खान्याजवळ गेलो. तेथे गाडीतून खाली उतरल्यावर लागलीच माझ्यावर लोखंडी फायटरने व लाकडी दांडक्यांने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गो तस्करीबाबत कारवाई करत असल्याचा रागातून झाला असून पूर्वनियोजितपणे हा हल्ला करण्यात आला, असे सपोनि अजित सावळे यांनी सांगितले.

७ जणांना २ दिवसांची कोठडी

अटकेत असलेले शेख सऊद शेख सलीम कुरेशी, शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी, जियाउद्दीन गया सुदिन काझी, शेख इब्राहिम शेख हमीद कुरेशी, शेख नाझीम शेख युनूस, शेख मंजूर शेख मकसूद, मझहर सय्यद जहांगीर अशा एकूण ७ जणांना चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.