Wednesday, May 25, 2022

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस ‘गुढीपाडवा’ (व्हिडीओ)

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आणि वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मराठी मनात या सणाचे विशेष महत्व दिसून येते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नानादी कर्म पार पाडून सूर्योदयानंतर  घराच्या प्रवेशद्वाराशी उंच बांबूला कडुनिंबाची डहाळी, रेशमी वस्त्र अथवा साडी, फुल हार आणि साखरेची गडी बांधून त्यावर धातूचे भांडे अशा स्वरूपात गुढी उभारली जाते.

- Advertisement -

गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षप्रतिपदेच्या निमित्ताने विघ्नहर्ता गणपती तसेच देवादिकांचे स्मरण, पूजन करून गुरु तथा वडीलधार्‍यांना वंदन करण्याची पूर्वापार परंपरा आहे. मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता घरोघरी हा उत्सव साजरा होतो.

- Advertisement -

गुढीपाडव्याची पार्श्वभूमी

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला, शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अश्या आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला आहे.

प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा केली जाते, यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला. पार्वती लग्न झाल्यावर माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाऊन अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते, अशीही आख्यायिका प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्राबाहेरील गुढीपाडवा

गुढीपाडवा किंवा चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून ‘संवत्सर पाडवो’ वा ‘उगादी’ अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक या उत्सवाला ‘चेट्री चंड्र’ नावाने संबोधतात.

गुढी शब्दाचे गूढ

तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ ‘लाकूड अथवा काठी’ असा आहे. ‘तोरण’ असा अर्थ यात अभिप्रेत आहे. दाते, कर्वे लिखित ‘महाराष्ट्र शब्दकोशा’चा आधार घेतला तर “गुढ्या घालुनी वनीं राहूं , म्हणा त्यातें । – प्रला १९ ” असे उदाहरण दिसून येते. यातील गुढ्या या शब्दाचा अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी, झोपडी, अथवा पाल म्हणजेच रहाण्याची जागा असा दिला आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. याचा गुढी असा उल्लेख लक्षात घेऊन ‘राहण्याची जागा’ या अर्थाने ‘गुडी’ हा शब्द येऊन दक्षिणेतली आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू राज्यातली (खासकरून आंध्रातील) स्थलनामांची म्हणजेच गावांच्या नावांची संख्या अभ्यासली असता लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड, बांबू, काठीने बनवलेले घर हा अर्थ लक्षात घेऊन गुढी हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात वापरला जातो. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड म्हजेच बांबू, काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा, आणि आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड, बांबू, काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.

पौराणिक आधार

महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने, इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. असा उल्लेख सापडतो. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव म्हणजे इंद्रोत्सव बंद करण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले जाते. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे, तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.

सणाव्यतिरिक्त महत्व

गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला सांस्कृतिकते प्रमाणेच आरोग्यदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या व कृषी विषयक महत्त्वही दिसून येते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खाल्याने पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे तसेच त्वचा रोग बरे होतात. धान्यातील कीड थांबवण्याचा औषधी गुण कडुनिंबाच्या अंगी असल्याचे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते. डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय,मानला जाऊन तिच्यात सूर्य बीज पेरतो आणि वर्षामुळे म्हणजेच पावसाने भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे, असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेतही रूढ आहेत.

गुढीपाडव्याच्या या मंगलदिनी अलीकडे विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात. दिवाळी पहाट, नववर्ष पहाट प्रमाणेच गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला रसिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. चला तर यंदाही हा बहुगुणी सण आपण उत्साहाने साजरा करूया.

शब्दांकन- राहुल पवार

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या