कोरोना मुक्ती संकल्पाची गुढी उभारूया !

0

कोरोना महामारीने गेले दोन वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. भारतही त्यातून सुटला नाही. दोन वर्षात कोरोनाची पहिली लाट त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या लाटेने त्रस्त केले. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीकडक लॉकडाऊन निर्बंधांना सामोरे जावे लागले. सर्व क्षेत्रात त्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागली.  विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिक, ज्यांचे हातावर पोट आहे अशी मंडळी आणि कामगार यांना याची चांगलीच झळ बसली.

लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने दररोज काम करून पोट भरणारे, रिक्षावाले, हातमजुरीवाले, हातगाडीवर व्यवसाय करणारे यांची तारांबळ उडाली. त्यांच्या रोजीरोटीवर संक्रांत आली. अगदीच प्रशासना पासून ते समाजसेवी संस्थांच्या पुढाकाराने त्यांच्या पोटापाण्याची सोय केली. उद्योगधंदे बंद झाल्यामुळे आपल्या परराज्यातील गावाकडे स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे हाल झाले. अनेक मजूर रस्त्याने पायपीट करून आपले गाव गाठत होते. मात्र अनेकांना प्राणालाही मुकावे लागले. काही मजूर रेल्वे लाईनवर झोपले असताना, अचानक मालवाहू रेल्वेने वीस जणांना चिरडल्याची ही घटना घडली होती.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी लोकांमध्ये प्रचंड भितीदायक वातावरण निर्माण झाले होते. घरातल्या एका जेष्ठ व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर, घरच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीकडून त्याला हात लावता जात नव्हता. ज्या कुटुंबात कोरोना रोगाची लागण झाली असेल त्या कुटुंबाला समाज वाळीत टाकत होता. अशावेळी आपले डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आणि काही सामाजिक कार्यकर्ते कोरोना योद्धा म्हणून काम करत होते. म्हणून या कोरोना महामारीतून अनेकांचा बचाव झाला.  महाराष्ट्रात झपाट्याने कोरोनाचा व्हायरस पसरत होता.

राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर फार मोठा ताण आलेला होता. सरकारी तसेच खाजगी रुग्णालय कोरोना पेशंटमुळे हाऊसफुल झाली होती.  कोरोनाची लागण झाल्याची चाचणी केल्यावर त्याचा अहवाल सुद्धा यायला आठ-दहा दिवस लागायचे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले. जळगाव जिल्हा त्यातही मागे नव्हता. कोरोनामुळे मृतांची टक्केवारी देशात एक नंबर वर होती. महाराष्ट्र शासनाने तातडीने त्याची दखल घेऊन डॉक्टरांचा स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण करून ते नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, कोरोना रुग्णांच्या उपचारादरम्यान अनेक गैरसोयी निर्माण झाल्या. जळगाव जिल्हा रुग्णालयात तर एक वृध्द कोरोना रोगी तीन दिवस बेपत्ता होता. अखेर त्याचे प्रेत वार्डमधील संडासमध्ये आढळून आल्याची घटना संपूर्ण देशात गाजली. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांचे आपापसातले वाद चव्हाट्यावर आले. त्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी डॉक्टर खैरे यांचा नाहक बळी देण्यात आला. प्रथम अधिष्ठाता म्हणून चांगली कामगिरी करणाऱ्या डॉक्टर खैरेंवर कारवाई झाली.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर बदलीची नामुष्की ओढवली. वास्तविक त्यांची कामगिरी चांगली होती, परंतु अवैध धंद्यांवर जरब बसवल्यामुळे त्यांची बदली झाली. अशा अनेक घटना पहिल्या लाटेत घडल्या.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना महामारी या विषयाची लोकांमध्ये असलेली भीती कमी झाली होती. तथापि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून ऑक्सीजन उपलब्ध करण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत होती. त्यावर मात करण्यात आली. याच काळात म्यूकरमायकोसिस या व्हायरसने सर्वांना हैराण केले. त्यासाठी लागणाऱ्या औषधींचा काळाबाजार होऊ लागला. बाजारात या औषधींचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला. अनेक रुग्ण या म्यूकरमायकोसिस मुळे दगावली. जे बचावले त्यांचे काही अवयव निकामी झाले. अशा परिस्थितीत कोरोनाच्या लाटांशी सामना करताना, दोन वर्षात कोरोना निबंधासाठी ज्या बाबींचा अवलंब करावा लागत असे त्याचे अनेकांनी काटेकोर पालन केले.

आता गुढी पाडव्यापासून कोरोनाचे सर्व निर्बंध शासनाने मागे घेतले आहे. आता पूर्णपणे आपले सर्व व्यवहार, कार्यक्रम सर्व आधीसारखे करू शकतो. महाराष्ट्राने जरी तिसरी लाट संपुष्टात आली म्हणून निर्बंध मागे घेतले असले, तरी कोरोनाचे पुन्हा आगमन होणार नाही याची आपण काळजी घेऊ या. कोरोनाच्या मुक्तीचा संकल्प करूया, नव्हे तर कोरोनामुक्ती संकल्पाची गुढी उभारूया आणि आपले आगामी जीवन सुखमय, आनंदमय करूया. त्यासाठी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.