राज्यात करोना रुग्णवाढीचा पंधरवडा ; स्थिती चिंताजनक

0

मुंबई : सातत्याने सुरू असलेल्या सरकारच्या प्रयत्नांमुळे नियंत्रणात आलेल्या करोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागील १५ दिवसांत रुग्णसंख्या जलदगतीने वाढली आहे. येथील रुग्णवाढीवर लक्ष ठेवण्याची अधिक गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. १६ ते ३१ मे या कालावधीत मुंबईमध्ये करोनामुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नसला तरी मार्चमध्ये ०.३४ टक्के असलेले चाचण्यांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण मे महिन्याच्या शेवटच्या १५ दिवसांमध्ये ३.२ टक्क्यांवर गेले आहे. मे महिन्यात शहरात पाच हजार ८८८ रुग्णांची नोंद झाली होती. यातील चार हजार ११४ रुग्ण हे मागील १५ दिवसांत नोंदवण्यात आले आहेत. मागील दोन महिन्यांच्या तुलनेत ही वाढ तिप्पट असल्याचे दिसून येते.

तिसऱ्या लाटेनंतर मार्च व एप्रिलमध्ये करोना रुग्णसंख्या अतिशय कमी होती. मे महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत तीन जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. मात्र या दिवसांत रुग्णवाढीचा वेग तुलनेने कमी होता. दरम्यान, आतापर्यंत एक कोटी ३४ लाख ४६ हजार ९६ जणांनी संस्थात्मक विलगीकरण पूर्ण केले असून, ३७ हजार ८२८ रुग्ण घरगुती विलगीकरणात आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ३००च्या आत आहे, तर लक्षणे नसलेले रुग्ण दोन हजार ६४३ एवढे आहेत.
सहआजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यायला हवी. तसेच प्रत्येकाने मास्कचा वापरही करणे गरजेचे आहे. ‘आयसीएमआर’ने लसीकरणासंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालनही प्रत्येकाने करायला हवे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. तर, ‘रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार वैद्यकीय तयारीही सुरू आहे. शाळा सुरू झाल्यानंतर १२ ते १४ या वयोगटातील लसीकरणावर अधिक भर देण्यात येईल’, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

‘रॅपिड अँटिजेन चाचण्यांतून करोनाचे निदान होत असले तरी त्याची नोंद होणे गरजेचे आहे. ही नोंद झाल्यानंतर रुग्णसंख्येमध्ये किती वाढ होते, हे नेमके लक्षात येणार आहे. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णसंख्येतील नेमकी वाढ लक्षात येत नाही’, असे पॅथालॉजिस्ट डॉ. महेश साळवी यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.