बनावट सह्या प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बनावट सह्या केल्या प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्यावर एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला पोलिस कर्मचा-याने याबाबत एरंडोल न्यायालयात कबुली दिली आहे.

सविता रोहिदास पाटील या महिला पोलिस कर्मचारी कासोदा पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. समन्स बजावणी अहवालावर कासोदा पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले साक्षीदार म्हणून पोलिस शिपाई जितेश संजय पाटील, महादू संतोष पाटील तसेच पंच नितीन वसंतराव पवार रा. कासोदा या तिघांच्या सह्या आपण केल्याचे महिला पोलिस कर्मचारी सविता पाटील यांनी एरंडोल न्यायालयात कबुल केले आहे.

कागदपत्रांचे, न्यायालयीन अभिलेख्याचे बनावटीकरण, बनावट दस्तावेज खरा म्हणून वापरल्याचे तसेच दस्तावेज बनावट असल्याचे माहिती असून देखील तो खरा म्हणून वापरण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगल्याचे तसेच न्यायालयाची दिशाभुल केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे मत फिर्यादीत व्यक्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी  एरंडोल दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहायक अधिक्षक अनिल नारायण पाटील यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.