लोकशाही न्यूज नेटवर्क
डोंबिवली – कॅबने प्रवास करत असताना चालकाने 23 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ऐरोली येथून आरोपी राकेश याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित २३ वर्षीय तरुणी ही कल्याण पूर्वेतील नेतीवली भागात राहत असून ती नवी मुंबई येथील खाजगी कंपनीत नोकरीला आहे. त्यातच पीडित तरुणी ही नवी मुंबई येथे नेहमीप्रमाणे शुक्रवारी कामावर गेली होती. त्यानंतर. रात्री कामी आटपून घरी जाण्यासाठी पीडितेने कॅब बुक केली.
कॅबमध्ये बसून ती घराच्या दिशेने प्रवास करत असतांना, कार कल्याण शीळ मार्गावरील सूचक नाका येथे येताच कॅब चालक राकेश याने पीडित तरुणीवर कारमध्येच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या लज्जास्पद कृत्यामुळे पीडित तरुणीने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घाबरलेल्या कॅब चालकाने पीडित तरुणीला पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास सूचक नाका रस्तावर सोडून पळ काढला होता.
दरम्यान या घटनेनंतर घाबरल्या पीडित तरुणीने कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठत कॅब चालका विरोधात भादंवि कलम 354, 509 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशुमख यांच्याशी संपर्क साधला असता, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कॅब चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार कुठल्या दिशेला गेली हे दिसून आले आहे. त्यानुसार तपास करत राकेश याला ऐरोली येथून अटक केली आहे.