दुध संघातील निवडणूक बनली सर्वांसाठी प्रतिष्ठेची; मतदान सुरु…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात जबरदस्त रस्सीखेच बघायला मिळत आहे. आणि तीच चुरस स्वायत्त संस्थेंच्या निवडणुकीतही दिसत आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर शहरातही सक्खे शेजारी पक्के वैरी झाल्याचे दिसून आले आहे. त्यातच आज जिल्हा दुध संघाची निवडणूक (District Milk Union Election)पार पडत आहे. त्यामुळे ती निवडणूक आजी माजी मंत्री व आमदारांसाठी प्रतिष्ठेची असल्याचे चित्र आहे.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, दूध संघाच्या माजी अध्यक्षा व एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

विशेष म्हणजे उद्याच या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीचे सहकार पॅनल व भाजप-शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनलमध्ये जिल्हा दूध संघाचे 20 संचालक निवडून देण्यासाठी थेट लढत होत आहे.

सर्वाधिक लक्षवेधी मंदा खडसे विरुध्द आमदार मंगेश चव्हाण ही लढत आहे. मुक्ताईनगरातून महाविकास आघाडीच्या पॅनलकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी दंड थोपटले आहेत.

या निवडणुकीसाठी रिंगरोडवरील संगम सोसायटीतील सत्य वल्लभ हॉलमध्ये मतदान होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.