छत्रपतींच्या दूरदृष्टी, नियोजनातून साकारलेली दुर्ग संस्कृतीतून कार्यसंस्कृती प्रेरणादायी- देवदत्त गोखले

0

जळगाव:- छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टी, शाश्वत विचार आणि नियोजनातून साकारलेली दुर्ग संस्कृतीतून कार्यसंस्कृती आजही प्रेरणादायी व उपयुक्त आहे असे प्रसिद्ध वक्ते देवदत्त गोखले यांनी प्रतिपादन केले. शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव आणि गोखलेज अँडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने ला ना शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती या विषयावरील 111 व्या कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अँड. सुशील अत्रे, गतीचे मार्गदर्शक प्रा.चारुदत्त गोखले, संचालिका रश्मी गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजच्या प्रचलित भाषेतील गड-किल्ले हे शब्द मूळ मराठी नसून महाराजांनी दुर्ग हा शब्द वापरला त्यातून त्यांचे प्रत्येक विषयातील वेगळेपण आपल्याला जाणवते असे सांगून तेव्हाची व आजची परिस्थिती गोखले यांनी उदाहरणांसह सांगितली. दुर्ग संस्कृतीतील यश प्राप्त करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन, शिस्त, सुरक्षा, नैसर्गिक स्त्रोतांची जपवणूक, संघटन कौशल्य या सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. शिवनेरी, सिंधुदुर्ग, तोरणा, पुरंदर, राजगड, रायगड, सिंहगड ,पन्हाळगड, सज्जनगड आणि प्रतापगड या प्रमुख दहा किल्ल्यांच्या माध्यमातून कार्य संस्कृतीशी संबंधित दहा पैलूंची त्यांनी मांडणी सादर केली. त्याची नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने परिणामकारकता आधारित शिक्षणासाठी उपयुक्तता कशी आहे हे देखील सांगितले.

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी क्षेत्र कोणतेही असो त्यात कार्य संस्कृती महत्त्वाची आहे. छत्रपतींनी एकसंघ भावनेच्या माध्यमातून स्वराज्याची निर्मिती केली असे मनोगत सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अँड. सुशील अत्रे यांनी आयोजक म्हणून भूमिका मांडताना सर्व सहकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृतीची प्रेरणा मिळावी म्हणून कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती दिली. प्रास्ताविक रश्मी गोखले यांनी तर सूत्रसंचालन सविता दातार यांनी केले. प्रारंभी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. परिचय सानिका पंचभाई यांनी तर गणेश वंदना व पसायदान संपदा छापेकर यांनी सादर केली. वैभव देसाई यांनी आभार मानले. कार्यशाळेस शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.