डॉ. व्ही. आर. पाटलांचा गूढ मृत्यू : आत्महत्या की स्वेच्छा समाधी?

मृत्यू पूर्वी चार पानी पत्र लिहून स्वातंत्र्यदिनी तापी नदीत त्यांनी घेतलेली उडी : ‘जलसमाधी’ बनली तज्ञांच्या चर्चेच्या आणि अभ्यासाचा विषय

0

लोकशाही कव्हर स्टोरी 

1) सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी अवघ्या 21 व्या वर्षी घेतली समाधी.

2) विनोबा भावे यांनी अन्नत्याग करून संपविली जीवन यात्रा.

3) संत ज्ञानेश्वर शिवाजी महाराज विवेकानंदांचा मृत्यू चटका लावून जाणारा, मी तर 80 वर्ष परिपूर्ण जीवन जगलो.

4) व्ही. आर. पाटलांनी पत्रात लिहिले आहे, “मी आत्महत्या केली?” नाही.. नाही.. “मी आनंदाने मृत्यूला कवटाळले.” कर्जबाजारी, दारुडे गरिबीला कंटाळलेले लोक आत्महत्या करतात.

5) मी सुखी आनंदाने जीवन ऐंशी वर्ष जगलो, मी जीवनात पूर्ण समाधानी.

6) व्ही. आर. पाटील म्हणतात, “पत्नी सिंधू आणि मी दोघांना एकत्र तापी नदीत उडी घेऊन मृत्यूला कवेत घ्यावे, असे मला वाटत होते. परंतु सिंधूची इच्छा झाली नाही. तिला अजून जगायचे आहे.”

7) पाळधी तालुका धरणगाव सारख्या खेड्यात श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळ स्थापन करून ज्येष्ठ आनंद फुलविला.

9) 80 वर्षाच्या कालावधीत बारा हजार गोरगरीब गरजूंच्या यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया केल्या.

10) बाबा आमटे, डॉ. अभय बंग यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजकार्य केले.

11) माझ्यामागे माझ्या मृत्यूवर कोणीही शोक करू नये, रडत बसू नये. आनंद साजरा करावा, असे व्ही. आर म्हणतात

जळगाव इथूनच जवळ असलेल्या पाळधी ता. धरणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते दलित मित्र डॉ. व्ही. आर. पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी स्वातंत्र्यदिनी तापी नदीत उडी घेऊन वयाच्या 80 व्या वर्षी आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या मृत्यूला आत्महत्या असे संबोधित केले जात असले, तरी डॉ. व्ही. आर. पाटील यांनी मृत्यूला आनंदाने कवटाळले. हे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात स्पष्ट होते. त्यामुळे डॉ. व्ही. आर. पाटलांचा मृत्यू आत्महत्या नसून त्यांनी घेतलेला स्वेच्छा जलसमाधी, हे त्यांच्या विचारातून पदोपदी स्पष्ट होते. त्यामुळे कायद्याच्या भाषेत ही आत्महत्या असली तरी आत्महत्येचा गुन्हा पोलिसांनी अधिक तपासाअंती मागे घेतला पाहिजे. म्हणजे एका सामाजिक कार्यकर्त्याचा त्याच्या विचाराचा सन्मान होईल.

डॉ. व्ही. आर. पाटील तीन दिवसांपूर्वी स्वातंत्र्यदिनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे स्वतःच्या कारने गेले, आणि कार बाजूला लावून गाडीत चिठ्ठी लिहून त्यांनी नदीत उडी घेत आपले जीवन संपवले. दुपारी त्यांचा मृतदेह अमळनेर तालुक्यात सापडला. त्यानंतर रात्री उशिरा पाळधी येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अख्खे पाळधी गावात तसेच जिल्ह्यात आणि श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळाच्या सदस्यांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.

डॉ. व्ही. आर. पाटील यांचे जीवन सुखी, संपन्न, पारिवारिक, समाधानी होते. मुलगा राकेश यशस्वी उद्योजक असून त्याचे आई-वडील, पत्नी मुले आणि बहिणीवर अतोनात प्रेम होते. डॉ. व्ही. आर. पाटलांना कसलीही आर्थिक विवंचना नव्हती. त्यामुळे वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत अव्याहत त्यांनी समाजकार्य केले. प्रत्येक महिन्याच्या 23 तारखेला निमित्त तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर नित्य नियमाने न चुकता व्हायचे. या नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत असे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात आणि लगतच्या जिल्ह्यातील मिळून १२०० मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केला. पंढरीच्या वारीला भाविक जातात तसे प्रत्येक महिन्याच्या 23 तारखेला पाळधी येथील नेत्र शस्त्रक्रिया शिबिराला हमखास पेशंट यायचे. या मोफत शस्त्रक्रियांबरोबरच वृक्षारोपण, पुरोगामी विचारवंतांची व्याख्याने, नाला खोली करणे व अंधश्रद्धा निर्मूलन तसेच संस्कार शिबिर आदी उपक्रमही पाळधी सारख्या गावात डॉ. व्ही. आर. पाटलांनी राबविले.

पाळधी सारख्या खेड्यात कस्तुरबा नावाचे हॉस्पिटल ते चालवीत. गोरगरिबांची अत्यंत माफक दरात ते उपचार करीत असत. खेड्यात राहणाऱ्या डॉ. व्ही. आर. पाटलांना वाचनाचे प्रचंड आवड होती. तुकाराम, गाडगेबाबा या संतांचा त्यांच्यावर प्रभाव होता. बाबा आमटे, डॉ. अभय बंग यांच्याकडून त्यांनी समाजकार्याची प्रेरणा घेतली. धर्मपत्नी सौ. आणि त्यांचे फार प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. माणूस जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ, शाश्वत असून त्याला आनंदाने सामोरे गेले पाहिजे. कवी सुरेश भट, भा. रा. तांबे, मंगेश पाडगावकर हे त्यांचे विशेष आवडते कवी होते.

कवी भा. रा. तांबेंची त्यांना भावलेली कविता त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. ती पुढील प्रमाणे..

राम कृष्णही आले गेले।
तयां विना हे जग ना अडले।
जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’
मी जातां राहील कार्य काय।

त्यामुळे कैलासवासी डॉ. व्ही. आर. पाटलांना मृत्यू विषयी भीती नव्हती. ते आनंदाने त्याला सामोरे गेले. डॉ. व्ही. आर. पाटलांनी संपूर्ण जीवन सुखमय व आनंदी घालविल्याने कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील ओळींना त्यांनी उल्लेख केला आहे. त्या पुढील प्रमाणे..

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती

कै. व्ही. आर. पाटील यांनी आपल्या मृत्यूच्या निर्णय दोन दिवसांपूर्वीच घेतला होता. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तापी नदीत आपले जीवन समर्पण करायचे, असा त्यांनी निर्णय घेतला होता. तो त्यांनी हसत हसत घेतला. याला कोणी म्हणेल डॉ. व्ही. आर. पाटलांनी आत्महत्या केली… नाही… नाही.. असा स्पष्ट उल्लेख करून “माझ्या मरणा नंतर कोणीही शोक व्यक्त करू नये. मला संपत्तीची कसलाही हव्यास नव्हता. मुलगा राकेशला आणि मुलीला संपत्तीचा हिस्सा किती द्यायचा हे मृत्युपत्रात लिहून ठेवले आहे. साने गुरुजींनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. राजा शिवछत्रपती अगदी कमी वयात गेले, स्वामी विवेकानंदांचा मृत्यू सुद्धा चटका लावून जाणारा आहे. मी तर संपूर्ण आयुष्य जीवन जगलो आणि कार्यभाग संपला म्हणून मी मृत्यू स्वीकारला..” असे डॉ. व्ही. आर. पाटलांनी पत्रात लिहून ठेवल्याने समाजसुधारक, तज्ञ आणि विचारवंतां समोर स्वेच्छा समाधीचा विषय ठेवला आहे. त्यावर साधक बाधक विचार मंथन झाले पाहिजे, ही या दै. लोकशाहीची स्टोरी देण्यामागचे प्रयोजन आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.