‘दादा’… जळगावकरांना अभिमान वाटणारा आपला माणूस..!

0

लोकशाही विशेष लेख 

दादा… अर्थात डॉ. अविनाश रामचंद्र आचार्य. एक मातृहृदयी, संवेदनशील, सेवाभावी व्यक्तिमत्व ! आपल्या व्यवसायालाच समाजसेवेचे रुप देणारा आधुनिक काळातील एक संघ स्वयंसेवक. रुग्णसेवा केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर त्याद्वारे स्वप्नपूर्तीचा आनंद देणारा शल्यचिकित्सक. मातृत्वाचा मनमुराद आनंद देत सामान्यांच्या हृदयावर अधिराज्य करणारा आपला माणूस. सहकाराला संस्काराची जोड देत कायम समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीचा विचार करणारे सहकारातील कार्यकर्ता. समाजाच्या उत्कर्षासाठी जोखीम घेणारा धाडसी माणूस. सेवेसाठी नावीन्यतेचा ध्यास आणि तोच जीवनाचा मूलाधार मानणारा योजक. वैविध्यतेने नटलेल्या भारतीय संस्कृती व परंपरांचा अभिमान बाळगणारा देशभक्त.

कार्यकर्त्यांना काही संदेश देण्यापूर्वी तो जगलेला कर्तव्यनिष्ठ माणूस. कार्यकर्त्याला मोठं करणारा दिलदार माणूस. प्रत्येकाला आपला गुरु वाटणारा मार्गदर्शक. प्रचंड व व्यापक जनसंपर्कातून समाजाची नाडी ओळखणारा सेवाभावी कार्यकर्ता. समाजबांधवांना सहोदरहो म्हणणारा सखा. “यशस्वी हो !” असा आशिर्वाद देणारा पिता. दादा या शब्दाने आदरयुक्त भीती वाटणारा चारित्र्यवान माणूस. निःस्वार्थ शब्दाला अर्थ देणारा सात्विक माणूस. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

आदरणीय दादांनी आपल्या जीवनातून सामाजिक कार्याचा कृतिशील आदर्श निर्माण केला. जीवन संदेश देणाऱ्या डॉ. आचार्यांनी आपल्या जीवनात “समाजावर आईसारखे नि:स्वार्थ प्रेम करु या !”, “सब समाज को लिये साथमे आगे है बढते जाना !”, “सीमेवर लढणाऱ्या जवानांची आठवण ठेऊ या !” यासारख्या स्वधर्म मंत्रांनी प्रेरित होऊन कार्य केले. आई-वडील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संस्कारातून मिळालेले सूत्र घेऊन आपले संपूर्ण जीवन डॉ. अविनाश आचार्य यांनी आपले जिवन समाज चरणी समर्पित केलेले दिसते. “भारत मातेच्या” पोटी जन्माला आलेल्या सर्वांना “सहोदरहो !” म्हणणार्‍या या कर्मयोग्याने विविध समाजोपयोगी उपक्रमाने परमेश्वरी सेवा केली असे नक्की म्हणता येईल. त्यांनी त्यांचे कार्य निरलस व निरपेक्षपणे करीत आपल्या जीवनाला अर्थ दिला म्हणूनच आज ते अनेकांच्या हृदयात वसलेले दिसतात.

दादा, आपल्या जीवनीतून

 

देखणी ती पाऊले 

जी ध्यासपंथे चालती 

वाळवंटातूनी

स्वस्तिपद्मे रेखिती… 

 

 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४

Leave A Reply

Your email address will not be published.